*मुंबई-* मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचे आज 10 ऑगस्ट रोजी सकाळी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. विजय कदम गत दीड वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी शनिवारी सकाळी राहत्या घरी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 2 वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. विजय कदम यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
विजय कदम यांच्यावर साधारणतः वर्षभरापासून कर्करोगाशी संबंधित उपचार सुरू होते. गतवर्षी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. ते हळूहळू त्यातून सावरतही होते. पण गत जानेवारी महिन्यात त्यांची अचानक प्रकृती बिघडली. तेव्हापासून ती बिघडतच गेली. आणि अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. विजय कदम गंभीर आजारी असल्याचे वृत्त समोर येताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. आपला लाडका अभिनेता या भयंकर आजारातून बरा व्हावा अशी प्रार्थना ते करत होते.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत विजय कदम यांनी त्यांच्या आजारपणात त्यांच्या पत्नी व मुलाने त्यांना खंबीर साथ दिली असे सांगितले होते. विजय कदम यांच्यावर 4 किमोथेरेपी आणि 2 सर्जरी झाल्या होत्या. उल्लेखनीय बाब म्हणजे विजय कदम 1980 आणि 90 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय होते. विजय कदम त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखले जात असे, त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या. त्या मोठ्या प्रमाणावर गाजल्या. विजय कदम हे त्यांच्या विनोदी पात्रांमुळे अधिक लक्षात राहिले. त्यांची अनेक नाटकं रंगभूमीवर गाजली. विशेषतः विच्छा माझी पुरी करा, रथचक्र, व टूर टूर ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली. त्यांनी चित्रपट क्षेत्रावरही स्वत:ची पकड मजबूत ठेवली होती. चष्मेबहाद्दर, पोलिसलाईन, हळद रुसली कुंकू हसलं आणि आम्ही दोघं राजा राणी या सारख्या चित्रपटांत त्यांनी अभियनाची छाप उमटवली.