*मुंबई-* सचिन वाझे महाविकास आघाडीचा कलेक्शन एजंट होते. सचिन वाझे यांनी सत्य विधान केले आहे. सचिन वाझेंनी सत्य बोलायला बोलायला सुरुवात केली आहे, असे म्हणत भाजप नेते नीतेश राणे यांनी मविआवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान नीतेश राणे म्हणाले की, अनिल देशमुख यांनी हिंमत असेल तर समोर येऊन या प्रकरणी खुलासा करायला हवा. या सर्व गोष्टीचा खुलासा करण्याची हिंमत अनिल देशमुख यांनी करायला हवी असे आमदार राणे यांनी म्हटले आहे.
*ठाकरेंनी अली संकल्प मेळावा असे नाव द्यावे*
नीतेश राणे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाविकास आघाडीतील सर्वांच्या कुंडल्या आहेत. फडणवीस मैदानात उतरले तर सर्वांचे वस्त्रहरण होईल. तर ठाकरेंनी शिवसंकल्प नाव ठेऊ नये, अली संकल्प मेळावा नाव ठेवावे. अली संकल्प मेळावा त्यांच्यासाठी जास्त सोयीस्कर नाव आहे, अशी खोचक टीका राणेंनी केली आहे.
*मविआचे वस्त्रहरण होईल*
नीतेश राणे म्हणाले की, सचिन वाझे यांना दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या खुनासंदर्भातही माहिती आहे. सचिन वाझे जसे जसे बोलत जातील, तसे तसे महाविकास आघाडीचे वस्त्रहरण होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
*सचिन वाझे काय म्हणाले?*
अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमांतून पैसे घेत होते असा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. मी त्यांच्या पीएकडे पैसे देत होतो या बद्दल सर्व माहिती मी फडणवीसांना पत्र लिहून दिली असे वाझे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्याने आता मोठी खळबळ उडाली आहे. वाझे यांचे हे पत्र अद्याप समोर आलेली नाही. मात्र एएनआय वृत्तसंस्थेशी बोलतांना त्यांनी माझ्याकडे अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरावे असल्याचा आरोप केला आहे.
*फडणवीसांना बदनाम करणे ठाकरे गँगचे उद्दिष्ट्य- भातखळकर*
भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, अनिल देशमुख हे अत्यंत भ्रष्टाचारी गृहमंत्री होते हे सिद्ध झालेले आहेत. अनिल देशमुख जामिनावर बाहेर आहेत. मात्र फडणवीसांना लक्ष करत त्यांना बदनाम करणे हेच उद्धव ठाकरे गॅंगचे सर्वात मोठे उद्दिष्ट्य राहिलेले आहेत. त्या माध्यमातूनच अनिल देशमुख हे फडणवीसांवर आरोप करत आहेत. त्यांना स्वतःचे थोबाड फोडून घ्यायची हाऊस आहे.