*रत्नागिरी, दि. 2 (जिमाका) : महसूल यंत्रणेचे फार मोठी ताकद आहे. ही ताकद हा विभाग सर्वसामान्य समाजासाठी सक्षमतेने आणि संवदेनशीलपणे काम करण्यासाठी वापरत आहे, याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात महसूल यंत्रणेचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज कौतुक केले. महसूल पंधरवडा कार्यक्रमातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जिल्ह्यातील 2 लाख 73 हजार 290 उद्दिष्टांपैकी 42 हजार 968 लाभार्थ्यांच्या 13 कोटींच्या फाईलवर स्वाक्षरी केली.*
जिल्हा महसूल प्रशासनाच्यावतीने महसूल पंधरवडा अंतर्गत विविध योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ वाटपाचा कार्यक्रम येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन झाले. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, तहसिलदार राजाराम म्हात्रे, कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत यावेळी म्हणाले, महसूल यंत्रणेचे काम 365 दिवस चालूच असते. महसूल पंधरवड्याच्या निमित्ताने महसूल यंत्रणेने नाविण्यपूर्ण काम दाखविण्याचा प्रयत्न करावा. महसूल यंत्रणेत विशेषत: ग्रामीण भागात तलाठ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही महसूल विभागाची ताकद आहे. या विभागाकडून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत राबविण्याची अपेक्षा असते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, लेक लाडकी, वयोश्री, बळीराजा मोफत वीज, तीर्थ दर्शन, युवा कार्य प्रशिक्षण या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी 15 दिवस काम करणार आहे. अहोरात्र मेहनत घेत आहे, हे अभिमानास्पद आहे.
जनतेचा विश्वास संपादन कसा करायचा हे महसूल अधिकाऱ्यांना चांगले माहिती आहे. त्या जोरावर कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न अतिशय संवेदनशील पध्दतीने जिल्ह्यात हाताळत आहेत. या यंत्रणेला सक्षम करण्याची जबाबदारीही आमची आहे. जिल्ह्यातील आदर्शवत प्रशासन आहे. अनेक अधिकाऱ्यांची बदली थांबविण्यासाठी आंदोलने झाली आहेत. यापुढेही असेच काम करावे, अशा शुभेच्छाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
*13 कोटींच्या फाईलवर सही*
पालकमंत्री श्री. सामंत यांनी प्रशासनाच्या उल्लेखनीय कार्याचा आपल्या भाषणात गौरव केला. हे सांगत असतानाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या 13 कोटी निधीच्या फाईलवर भाषण करतानाच सर्वांसमक्ष स्वाक्षरी करुन, उर्वरित सर्व पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा असाच लाभ दिला जाईल, असे ठामपणे सांगितले. यावेळी सभागृहातील उपस्थितांकडून टाळ्यांच्या कडकडात त्यांना प्रतिसाद दिला गेला.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, शासनाचे महत्त्वाकांक्षी कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन, बळीराजा मोफत वीज, युवा कार्य प्रशिक्षण योजना यावर महसूल विभागांने अधिक भर दिला आहे. राजशिष्टाचार, निवडपणुका, आपत्ती व्यवस्थापन या सर्वात महसूल विभागाचा सहभाग असतो. या विभागाने महसुली उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 2 लाख 73 हजार 290 उद्दिष्टांपैकी 42 हजार 968 लाभार्थ्यांना 13 कोटींची मंजुरी दिली. अन्नपुर्णा योजनेचे संभाव्य लाभार्थी 90 हजार 452 आहेत. बळीराजा मोफत वीज योजनेसाठी 19 हजार 306 शेतकरी लाभार्थी आहेत. राज्य शासनाच्या या योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत 100 टक्के पोहचविण्यासाठी महसूल विभागाचे खूप चांगले काम आहे.
*यावेळी महसूल मार्गदर्शिका 2024 चे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.*
मुख्यमंत्री वयोश्री योजना , मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महाराष्ट्र लेक लाडकी योजना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, महसूल विभागामार्फत विविध आवश्यक दाखले यावेळी लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये 35 उद्योजक व 1 हजार उमेदवार यांनी नोंदणी केलेली असून 13 उद्योजक, शासकीय आस्थापना यांच्याकडे 108 उमेदवारांना रुजू करुन घेण्यात आले. या सर्व उमेदवारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी सर्वांचे आभार मानले.