*रत्नागिरी/प्रतिनिधी-* *पाली येथील तक्षशिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा आजपर्यंतचा कारभार पारदर्शकपणा आहे. संस्थेचे अध्यक्ष नितीन कांबळे यांनी इवल्याश्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर केले आहे. रौप्य महोत्सवी वर्षात २५ कोटी रुपयांच्या ठेवी असलेली तक्षशिला पतसंस्था सुवर्ण महोत्सवी वर्षात म्हणजे ५० व्या वर्षी १०० कोटीचा टप्पा ओलांडेल आणि इतर पतसंस्थांना या पतसंस्थेचे आदर्श घ्यावा लागेल असे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.* पाली येथे तक्षशिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव आणि वार्षिक आढावा सभेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील पतसंस्था ज्या पद्धतीने काम करते. या पतसंस्थेचा आदर्श इतर पतसंस्थेने घेऊन आपली वाटचाल करावी असेही ते म्हणाले. तक्षशिला पतसंस्थेचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. २५० सभासद संख्या असलेली पतसंस्था आज ४ हजारी पार करून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. असाच आलेख वाढत राहिल्यास ही पतसंस्था सहकार पतसंस्थेच्या पुढे ही जाईल असा विश्वास व्यक्त करत, रत्नागिरी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात या पतसंस्थेची जिल्हा शाखा बनवण्याचं आश्वासन यावेळी राज्याचे उद्योग मंत्री व पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी यावेळी दिले.
यावेळी तक्षशिला स्मरणिका २०२४ पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी या पतसंस्थेला शुभेच्छा देत स्मरणिकेचे कौतुक केले.
यावेळी शिवसेना रत्नागिरी तालुका प्रमुख बाबू म्हाप, पाली गावचे सरपंच विठ्ठलशेठ सावंत, नानिज सरपंच विनायक शिवगण, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मधुकर टिळेकर, रामभाऊ गराटे, प्रांत देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पाली गाव प्रमुख संतोष सावंत देसाई, नाणीजचे माजी सरपंच गौरव संसारे, ज्येष्ठ समाज सेवक रमेश कसबेकर, पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद हितचिंतक, संस्थेचे आजी, माजी संचालक आदी पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
*कार्यक्रमावेळी बोलताना तक्षशिला पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन कांबळे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत गेला याची माहिती दिली. तसेच हे काम करत असताना अनेक अडचणी आल्या, अनेकांनी सहकार्य केले. सहकारात कस टिकून राहायचं याच मार्गदर्शन ज्यांच्याकडून मिळाले त्यांचे आभार त्यांनी मानले. २०१४ पासून पदभार स्वीकारल्यानंतर पतसंस्थेत कोणकोणत्या सुविधा प्राप्त करून देण्यात आल्या याची माहिती दिली. ग्रामीण भागात पतसंस्था असूनही, ATM, RTGS, Net banking, QR code अशा माध्यमातून पतसंस्थेने प्रगती करत डिजिटलायझेशनच्या दृष्टीने पावले उचलली आहेत असे सांगितले. तसेच या वर्षी सभासदांना 8 टक्के लाभांश खात्यात जमा करण्यात आला असल्याचे सांगत गणपतीची भेट दिली आहे.*
पतसंस्थेच्या उत्तम कामगिरीची सहकार क्षेत्राने दखल घेत आजपर्यत ६ पुरस्कार स्वीकारले आहेत. नुकताच पतसंस्थेच्या दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त झाला आहे. यामुळे आजच्या दिवशी असलेला हा दुग्धशर्करा योग आहे असे ते म्हणाले. पतसंस्थेचे सचिव प्रवीण गुरव यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा वाचून दाखला. संस्थेने केलेले समाजोपयोगी उपक्रम यांची माहिती दिली.
या कार्यक्रमावेळी पतसंस्थेने शाळेतील गुणवंत विद्यार्थांना प्रमाणपत्र देऊन गौरव केला. तसेच सभासद हितचिंतक, पतसंस्थेला नोटा मोजण्याचे मशीन उपलब्ध करून देणारे सुनील सेल्स अँड सर्व्हिसेस सुनील गेल्ये यांचा सत्कार करण्यात आला
तरुण भारतचे पत्रकार ॲड. सागर पाखरे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पतसंस्थेची रौप्य महोत्सवी स्मरणिकेचे लेआऊट, डिझाईन्स व संपादकीय म्हणून काम पाहिलेले पत्रकार समीर शिगवण यांचाही शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावरील मान्यवरांना गौरवपत्र व शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. वसुली अधिकारी देसाई यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे पाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक मोहिते सर यांनी उत्तम सूत्रसंचालन केले. त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तक्षशिला पतसंस्थेचे उपाध्यक्ष अमोल सावंत यांनी सर्व मान्यवर, सभासद, हितचिंतक, कर्मचारी, सहकारी यांनी घेतलेली मेहनत तसेच हस्ते, परहस्ते संस्थेला मदत करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानले.