आपत्ती:सात राज्यांत 46 बळी; केदारमध्ये हजार लोक अडकले, हिमाचलला 50 बेपत्ता, बचावकार्यासाठी वायुदलास पाचारण…

Spread the love

*कुलू/सिमला/डेहराडून-* देशात मान्सूनच्या पावसाने कहर केला आहे. गत २४ तासांत ७ राज्यांत पूर आणि मुसळधार पावसामुळे झालेल्या घटनांत ४६ लोकांचा मृत्यू झाला. ५६ बेपत्ता आहेत. उत्तराखंड राज्यात बुधवारी रात्री केदारनाथ धाममध्ये ढगफुटी झाल्यानंतर सुमारे ३ हजार भाविक भीमबली, लिंचोली, महाबली व गौरीकुंडात अडकले होते. त्यांना एसडीआरएफ व एनडीआरएफने मोठ्या कष्टाने वाचवले. राज्याच्या हेलिकॉप्टर सेवेद्वारे ७३७ प्रवाशांना लिंचोली, भीमबली ते सोनप्रयागपर्यंत आणले. केदारनाथ धाममध्ये अजून सुमारे १ हजार लोक अडकून आहेत. त्यांना वायुदल शुक्रवारी सकाळी दोन हेलिकॉप्टरने बाहेर काढणार आहे.

हिमाचलच्या कुलू, सिमला, चंबा व मंडीत ५ ठिकाणी ढगफुटी व पुरामुळे १२ तासांत एका राष्ट्रीय महामार्गासह ५ रस्ते उद्ध्वस्त झाले. तीन पुलांचे नुकसान झाले. मलाना धरण फुटले. आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला. ५० जण बेपत्ता आहेत. धोक्याच्या पातळीवरून वाहणाऱ्या पार्वती-व्यास नद्यांनी अनेक इमारतींना कवेत घेतले. २४ तासांत उत्तराखंडमध्ये १४, दिल्लीत ६, झारखंडमध्ये ५, जयपूरमध्ये ३ व बिहारमध्ये ११, जम्मूत एकाचा मृत्यू झाला.

*ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये १०% जास्त पाऊस*

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देशात भरपूर पाऊस होईल, पण उष्णताही जाणवेल व कमी वेळेत जास्त पाऊस होण्याच्या घटनाही जास्त घडतील. भारतीय हवामान विभागानुसार, ऑगस्टमध्ये सरासरी २५४.९ मिमी पाऊस होतो. यंदा १०६% होईल. कारण चौथ्या आठवड्यापासून ला-निनाची स्थिती सक्रिय होईल. सप्टेंबरमध्ये आकडा १०% पेक्षा जास्त राहील. आयएमडीच्या मते, यंदा जुलैच्या रात्री इतिहासात सर्वात उष्ण राहिल्या. देशाचे सरासरी किमान तापमान २४.९९ अंश राहिले. हे १९०१ ते आतापर्यंतचे सर्वाधिक आहे.

*संसदेत गळती… छतावरून गळत होते पाणी*

दिल्लीत मुसळधार पावसामुळे गुरुवारी सकाळी नव्या संसदेच्या लॉबीतही पाणी टपकत होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. नंतर लोकसभा सचिवालयाने वक्तव्य जारी करत सांगितले की, छताचा काही भाग काचेचा आहे. तेथील चिकटवणारा पदार्थ निघाला होता. याची दुरुस्ती करण्यात आली आहे.

*केदारनाथ पायी मार्ग : ३ हजार भाविक अडकले होते*

केदारनाथ खोऱ्यात गेल्या रात्री भीतीचे वातावरण होते. मंदिराच्या पायी मार्गावर ढगफुटी झाल्यानंतर दोन पूल व ३० मीटरचा रस्ता वाहून गेला होता. यामुळे ४ ठिकाणी सुमारे ३ हजार लोक अडकले होते. त्यांच्यापैकीच एक अजमेरच्या गौरव बन्सलने दिव्य मराठीला सांगितले, आम्ही गौरीकुंड येथे होतो. रात्री ९ वाजता पोलिस धावत आले व ओरडायला लागले- वरच्या दिशेने पळा. आम्हाला समजले की, काहीतरी आपत्ती आली आहे. मी कुटुंबासह पर्वतावर चढत होतो. आमच्यासोबत १५० लोक होते. मंदाकिनी नदीच्या पुरात गौरीकुंड ते सोनप्रयागपर्यंतचा २०० मी. रस्ता वाहून गेला होता. म्हणून या भागातून बाहेर निघण्यासाठी पर्वताचा रस्ताच शिल्लक होता. संपूर्ण रात्र आम्ही पर्वतावर घालवली. पहाटे ५ वाजता वचावकार्य सुरू झाले. एसडीअारएफ कमांडंट मणिकांत मिश्रा म्हणाले, आम्हाला चार ठिकाणांहून भाविकांना काढायचे होते. रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे आम्ही पर्वताच्या मार्गाने २ किमीचा पर्यायी रस्ता बनवला. तो खूप जोखमीचा होता. रात्री ११ वाजेपर्यंत सर्व ३ हजार लोकांना सोनप्रयागला आणले.

*केरळ :* वायनाडमध्ये आलेल्या आपत्तीत मृतांची संख्या गुरुवारी वाढून १७७ झाली. काँग्रेस नेते राहुल व प्रियंका गांधी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींची भेटही घेतली. याचदरम्यान लष्कराने आपले बचावकार्य पूर्ण केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page