*भारतीय महिला तिरंदाजी संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत*
*पॅरिस :* पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला तिरंदाजीच्या रँकिंग फेरीला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. या फेरीत भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर राहिला. त्यांनी 1983 गुण मिळवले. संघानं थेट उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या फेरीत कोरियानं ऑलिम्पिकमधील विक्रम मोडत 2046 गुणांसह पहिलं स्थान पटकावलंय. यात चीन (1996 गुण) दुसऱ्या आणि मेक्सिको (1986 गुण) तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय तिरंदाज अंकितानं मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली असून, ती 666 गुणांसह 11व्या क्रमांकावर आहे. भजन 659 गुणांसह 22 व्या आणि दीपिका कुमारी 658 गुणांसह 23 व्या स्थानावर आहे.
*एकेरी मध्ये निराशजनक प्रदर्शन :*
भारतीय खेळाडूंच्या वयक्तिक कामगिरीवर नजर टाकल्यास अंकिता 11व्या, भजन कौर 22व्या आणि दीपिका कुमारी 23व्या स्थानावर आहे. अंकितानं उत्तरार्धाच्या शेवटच्या दोन सेटमध्ये शानदार पुनरागमन केलं, ज्यामध्ये तिनं 120 पैकी 112 गुण मिळवले. शेवटच्या क्षणांमध्ये, विशेषतः 18 वर्षीय भजन कौरची अतिशय खराब कामगिरी दिसून आली, तिनं एकूण 659 गुण मिळवले. तर दीपिका तिच्यापेक्षा एका गुणानं मागे होती आणि 658 गुणांसह तिनं रँकिंग फेरी पूर्ण केली.
*भारताचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश :*
या खेळात सांघिक यादीत टॉप-4 मध्ये स्थान मिळविणाऱ्या संघांना थेट सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळतो. भारत 1983 गुणांसह चौथ्या स्थानावर असल्यानं त्यांनी थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा आता उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्स विरुद्ध नेदरलँड्स सामन्यातील विजेत्याशी सामना होईल. तर सांघिक क्रमवारीत 5 व्या ते 12 व्या क्रमांकावर असलेल्या संघांना प्रथम 16 फेरीतून जावं लागेल. रँकिंग फेरीचा उद्देश तिरंदाजीमध्ये 128 खेळाडूंचा एक गट तयार करणे होता. आता हे 128 खेळाडू आपापल्या क्रमवारीच्या आधारे एकेरी स्पर्धेत वैयक्तिकरित्या एकमेकांसमोर उभे ठाकतील. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी या खेळाडूंना प्रथम राउंड ऑफ 64, नंतर राऊंड ऑफ 32 आणि नंतर प्री-क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलमधून प्रवास करावा लागेल.