चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पहिल्याच पावसात संरक्षक भिंत कोसळण्याची घटना घडली. तर आता या घाटातील काँक्रीट रस्ता खचत असल्याने एकेरी मार्ग बंद ठेवण्याची प्रशासनावर नामुष्की आली. या साऱ्या प्रकाराचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मा. तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी परशुराम घाटात मंगळवारी रात्री सत्यनारायणाची महापूजा घालत अनोख्या पध्दतीने आंदोलन करीत या ठेकेदार कंपनी व प्रशासनाचा निषेध केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे मात्र निकृष्ट दर्जाच्या कामाचे नमुने समोर आले आहेत.
चिपळूण बहादूरशेख नाका येथील पूल पडण्याची घटना असो तर आता या पावसाळ्यात चिपळूण शहरातील मुंबई-गोवा महामार्गावर हॉटेल वैभव समोर पिलरची पियर कॅप काढताना पिलरवरून तीन कामगार जमिनीवर पडून जखमी झाल्याची घटना घडली. तसेच सावर्डे- वहाळ फाट्यावरील पुलाच्या जोडरस्त्याचे काँक्रीट खचण्याचे समोर आले आहे. यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची ठेकेदार कंपनी व प्रशासनावर नामुष्की आली.
या साऱ्या घटना समोर येत असतानाच पहिल्याच पावसात परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळली. तर आता या घाटातील काँक्रीट रस्ताच खचल्याने या घाटात एकेरी वाहतूक सुरू आहे.ठेकेदार कंपनीकडून होत असलेल्या निकृष्ट कामांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मा. तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीने आंदोलन करीत निषेध व्यक्त केला. यावेळी सुरेश बहुतुले, संतोष चोपडे, आनंद खैर, विजय नेवरेकर, अविनाश सावंत, चिराग सावंत तसेच युवासेना कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.