ठाणे : कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्प्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी रेल्वे विकास प्रकल्पातून निधी दिला जाणार आहे. सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना एलआयसीच्या कर्जातून कोकण रेल्वेला निधी देण्याची घोषणा केली त्यावेळी रोहा ते वीर या टप्प्याचे दुपदरीकरण करण्यात आले आहे. बोगद्यांचे क्षेत्र सोडून दुपदरीकरण करण्याचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला देण्यात आला होता. आताच्या केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात याचे सूतोवाच करण्यात आले आहे.
कोकण रेल्वेचा 720 किमीचा एकूण मार्ग आहे. त्यातला बहुतांश टप्पा हा कोकण विभागात म्हणजेच महाराष्ट्रात आहे. तर गोवा, कर्नाटक, केरळ राज्यापर्यंत हा मार्ग विस्तारित होतो. कोकण रेल्वे मार्गावर दररोज 150 पेक्षा जास्त एक्स्प्रेस चालवल्या जातात.
हा प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या रेल्वे मार्गाचा दुपदरीकरणाचा टप्पा जाहीर केला आहे. पहिला टप्पा 60 किमीचा करण्यात आला आहे. रोहापर्यंत मध्य रेल्वेचा भाग येत असून रोहा ते ठाकुर्लीपर्यंतचा एकूण 720 किमीचा हा मार्ग आहे. दुपदरीकरणाचा दुसरा टप्पा हा 70 किमीचा असणार आहे. त्यामागच्या दुपदरीकरणासाठी रेल्वे मंत्रालयाने पावले उचलली आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेचे जाळे अधिक विस्तारणार असून त्यात कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचाही टप्पा घेण्यात आला आहे.
गाड्यांचा वेग दुप्पट वाढणार
कोकण रेल्वेची निर्मिती करताना प्रा. मधू दंडवते यांनी काही टप्पे जाहीर केले होते. पहिला टप्पा आपटा ते वीर, दुसरा टप्पा वीर ते चिपळूण, तिसरा टप्पा चिपळूण ते रत्नागिरी, चौथा टप्पा रत्नागिरी ते सावंतवाडी असा होता. आताही अशाच टप्प्याच्या माध्यमातून दुपदरीकरण होणार आहे.
मात्र जिथे सर्वात जास्त लांबीचे बोगदे आहेत, अशा ठिकाणी सिंगल लाईन ठेवली जाणार आहे आणि बोगद्याच्या दोन्ही बाजूला पासिंग स्टेशन तयार केले जाणार आहे. यामुळे आताच्या कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग दुप्पट वाढणार आहे. सध्या मुंबई ते गोवा हे अंतर कापण्यासाठी 10 ते 12 तास लागतात. तर वंदे भारत सारख्या रेल्वेला 8 ते 10 तास लावतात हा वेळ 2 ते 3 तासाने कमी होऊ शकणार आहे.