रत्नागिरी : कोसळत्या जलधारांनी चिंब भिजणारा सुंदरगड, आकर्षक फुलांनी व रोषणाईने सजलेले संतपीठ, एवढ्या पावसातही आपल्या गुरुवरील श्रध्देपोटी जमलेला लाखो भक्तांचा सागर, मन प्रसन्न करणारे मंत्रस्वर आशा भारावलेल्या श्रध्देय वातावरणात आज येथे गुरुपूजन झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी सर्वाना भरभरून आशीर्वाद दिले.
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे सुंदरगडावर जयघोषात सहकुटुंब आगमन झाले. प्रथम त्यांनी सर्व देवदेवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर ते संतपीठावर आले. त्यांच्यासमवेत प.पू. कानिफनाथ महाराज, गुरुमाता सौ सुप्रियाताई, सौ ओमेश्वरीताई, देवयोगी महाराज होते.
या वेळी संतपीठावर भक्तांमधून प्रातिनिधीक पूजेचा मान पुण्यातील अर्जुन महादेव फुले व सौ. भारती अर्जुन फुले या जोडप्याला मिळाला. वेदशास्त्र संपन्न भालचंद्र शास्त्री शौचे गुरुजी यांच्या समवेत ब्रह्मवृंद संतपीठावर होते. त्यांच्या मागदर्शनानुसार विधीवत मंत्रघोषात सारे भाविक पूजा करीत होते.
एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी असूनही येणाऱ्या प्रत्येक भाविकाला पोटभर प्रसाद मिळेल असे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी सुरू झालेल्या मोफत आरोग्य शिबिराची सांगता आज सायंकाळी झाली. अनेक भाविकांनी त्याचा लाभ घेतला. नामवंत डॉक्टरनी शिबिरात तपासणी आणि उपचार केले.