प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा काढणार:म्हणाले – मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, ही जरांगेंची भूमिका न पटणारी…
मुंबई- राज्यात शांतता नांदावी, ओबीसींचे आरक्षण कायम रहावे, ही प्रमुख मागणी करत आज मंगळवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रेची घोषणा केली. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. येत्या 25 जुलैपासून ही यात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात सद्यस्थितीत मराठा ओबीसी आरक्षणावरून वाद निर्माण झालेला आहे. मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण करण्यास सरकार तयार नाही, तर दुसरीकडे ओबीसी संघटनांनी देखील जरांगे यांच्या मागणीला विरोध दर्शविला आहे. या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीने आरक्षणासंदर्भात आपली भूमिका जाहीर केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्राची प्रतीक्षा…
प्रकाश आंबेडकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्यात सध्या जरांगे पाटील यांची मागणी जोर धरून आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, ही त्यांची भूमिका आम्हाला न पटणारी आहे. या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी एक सर्वपक्षीय बैठक देखील पार पडली. त्यावेळी सर्व पक्षांनी आपली लेखी भूमिका सरकारकडे द्यावी, असे ठरले होते. परंतु, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रत्येक पक्षाला पत्र दिले जाणार होते, तशा आशयाचे पत्र अद्याप वंचित बहुजन आघाडीला मिळालेले नाही. सर्व राजकीय पक्षांना पत्र गेले की नाही, याबाबत मला माहित नाही. पण आम्हाला जेव्हा पत्र येईल, तेव्हा आम्ही वंचितची भूमिका मांडणार आहोत.
आरक्षण बचाव यात्रेचा मार्ग कसा असेल?…
25 जुलै रोजी दादर चैत्यभूमी येथून ‘आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात होणार आहे. 26 जुलै रोजी शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रा पुढे निघेल. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना या जिल्ह्यातून ही यात्रा निघणार आहे. तसेच, 7 किंवा 8 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये या यात्रेची सांगता होणार आहे. या मार्गावरती कॉर्नर बैठका देखील पार पडणार आहे.
स्फोटक परिस्थिती शांत व्हावी
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ही यात्रा काढण्याची मुख्य भूमिका आम्ही अगदी स्पष्ट केलेली आहे. आम्हाला वाटते की, राज्यातील जी स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे, ती शांत झाली पाहिजे. राज्यात सर्वत्र शांतता नांदावी. दुसरे म्हणजे सर्व समाजाचे आरक्षण वाचले पाहिजे, एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्ये वाढ झाली पाहिजे, गेल्या कित्येक वर्षांपासून त्यात ना केंद्र सरकार ना राज्यसरकार वाढ करते. तसेच ओबीसींच्या मुलांना जी शिष्यवृत्ती मिळते, त्यात देखील भरघोस वाढ होणे तितकेच गरजेचे आहे.
जरांगेंचं आंदोलन 31 खासदारांसोबत?…
मनोज जरांगे यांचे आंदोलन गरीब मराठ्यांचं आदोनल आहे. ते जरांगे यांना पाठिंबा देत आहे. पण त्यांना प्रतिनिधी मिळत नाही. त्यांचं आंदोलन कुठे जाईल, कसं जाईल हे सांगता येत नाही. मराठ्यांना आरक्षण न देणं हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे. आंदोलनं ही श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झालं पाहिजे. तसेच आंदोलन भरकटलंय असं म्हटलेले नाही. म्हणणार देखील नाही. पण मनोज जरांगे पाटील यांना ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. ते श्रीमंत मराठ्यांसोबत आहेत की, 31 खासदारांसोबत आहेत की गरीब मराठ्यांसोबत आहेत? याचा विचार करावा लागणार आहे, असा टोला देखील प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
श्रीमंत मराठ्यांनी गरिबांना फसवले…
प्रकाश आंबेडकर यांनी पुढे बोलताना मराठा आरक्षणावर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, श्रीमंत असलेला मराठा हा कायम गरिबांना फसवत आलेला आहे. त्यांनी टिकावू आरक्षण दिलेले नाही. त्यामुळे ओबीसींच्या हातात सत्ता द्या, त्या सत्तेचा उपयोग आम्ही गरीब मराठ्यांना टिकावू आरक्षण देण्यासाठी करणार आहोत.
घाईघाईत काढलेली कुणबी सर्टिफिकेट रद्द करा…
सगेसोयरे ही भेसळ आहे. ओरिजनल मंडल कमिशनची यादी जोडल्या गेली होती. 1993 मध्ये कुणबी समाजाला आरक्षण दिले गेले, ते शाबूत आहे. मात्र इतर मार्गाने सध्या काही जण मिळवू पाहात आहेत. घाई घाईत आता काढलेली कुणबी सर्टिफिकेट रद्द करा, अशी मागणी देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली. तर ज्यांनी अर्ज केलेले आहेत नोंदीप्रमाणे त्यांना मिळून जातील, असेही ते म्हणाले. आमच्या यात्रेत येण्याला आम्ही कोनाला नाही म्हणत नाहीत. छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, वाघमारे यासह कोणीही आमच्या यात्रेत येऊ शकते.
सर्वपक्षांनी भूमिका घ्यावी..
आमची भूमिका आहे की, राज्यातील स्फोटक परिस्थिती झालेली आहे, ती बदलली पाहिजे, शांतता कायम राहावी. वंचित बहुजन आघाडी असो किंवा ओबीसी संघटना यांची भूमिका यांची स्पष्ट आहे. मात्र, अन्य संघटनांनी किंवा राजकीय पक्षांनी अजून भूमिका घेतलेली नाही. या यात्रेचा उद्देशच तो आहे की, सर्व राजकीय पक्षांनी देखील त्यांची स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.