मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस नुकतीच सुरू झाली. मात्र, या दोन्ही एक्स्प्रेसमुळे मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलचे वेळापत्रक कोलमडू लागले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सीएसएमटी- शिर्डी आणि सोलापूर या ‘वंदे भारत’ सुरू झाल्या. मात्र, या गाडय़ांमुळे यापूर्वीच १६ मेल- एक्स्प्रेस, पुण्यातील ६ उपनगरीय लोकल आणि पुण्यातील एका डेमूच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. आता लोकलचे वेळापत्रकही बदलण्यात आल्याचे समजते.
स्वतंत्र रेल्वे रूळ नसल्याने इतर गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. शिर्डीकडे जाणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे डाऊन लोकल आणि सोलापूरहुन येणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे अप लोकलच्या वेळापत्रकात बदल केला. यात कसारा, कर्जत, आसनगाव, बदलापूर, अंबरनाथ, ठाण, कल्याण १५ डबा लोकल वेळापत्रकावर परिणाम झाला. मात्र, लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आला नसल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले.
प्रवाशांचा चांगला प्रतिसाद..
सीएसएमटी – शिर्डी, ‘वंदे भारत’ गाडीचे पहिल्याच आठवडय़ात १०० टक्के आरक्षण झाले होते. शनिवारी सीएसएमटी शिर्डी ‘वंदे भारत’मधील १ हजार २४ ‘चेअर कार’पैकी १ हजार ३४ आणि १०४ ‘एक्झिक्युटिव्ह’पैकी ९७ आसने आरक्षित झाली होती. त्या मानाने सीएसएमटी – सोलापूर ‘वंदे भारत’मधील ४८.४९ टक्के आरक्षण झाले. १ हजार २४ ‘चेअर कार’पैकी ४६८ आणि १०४ ‘एक्झिक्युटिव्ह’पैकी ७९ आसने आरक्षित झाली होती.