ब्रिटनमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या असून ब्रिटनमध्ये सत्तांतर पाहायला मिळाले. या निवडणुकीत लेबर पार्टीचा मोठा विजय झाला आहे. लेबर पार्टीने जवळपास ४०० पेक्षा जास्त जागा मिळवल्या असून निवडणुकीत ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीचा पराभव केला आहे. या सत्तांतरानंतर लेबर पार्टीचे नेते कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. शिवाय या वेळी आणखी एका घटनेने सर्वांच्या नजरा ब्रिटनमध्ये होत्या.
ब्रिटनमधील निवडणुकीत भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी ब्रिटनमधील लिस्टर पूर्वमधून मोठा विजय मिळवला आहे. यानंतर त्यांनी खासदारकीची शपथ घेतली. त्यांचा हा शपथ घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच त्यांचे सर्वत्र कौतुक देखील केले जात आहे. शिवानी राजा यांनी खासदार म्हणून शपथ घेत असताना त्यांच्या हातात भगवद्गीता होती.
शिवानी राजा यांनी खासदारकीची शपथ घेतानाचा एक व्हिडीओ एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, “लिस्टर पूर्वचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संसदेत शपथ घेणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. गीतेवर हात ठेवून महामहीम राजे चार्ल्स यांच्या प्रति आपल्या निष्ठेची शपथ घेणं माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.”
दरम्यान, शिवानी राजा यांनी १४ हजार ५२६ मते मिळवत त्यांच्या विरोधी उमेदवाराचा ४ हजार ४२६ मतांनी पराभव केला. यूकेमध्ये ६५० जागांवर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मजूर पक्षाने ४१२ जागा जिंकल्या आहेत. तर ऋषी सुनक यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला फक्त १२१ जागा जिंकता आल्या आहेत. खासदार शिवानी राजा यांची आई राजकोटच्या आहेत तर वडील गुजराती आहेत. शिवानी राजा यांचा जन्म लिस्टरमध्ये झालेला आहे.