
संगमेश्वर :- तालुक्यातील किरदाडी येथे जंगलमय भागात असलेल्या शेत विहिरीत पडून १० रान डुक्करांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. जेसीबीच्या साहाय्याने या डुक्करांना विहिरीतून बाहेर काढत विल्हेवाट लावण्यात आली.
ही रानडुक्करे सुमारे सात दिवसांपुर्वी विहिरीत पडली असावीत, असा अंदाज देवरूख वनविभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ही रानडुक्करे कुजलेल्या स्थितीत होती.
याबाबत देवरूख वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, किरदाडी येथील विष्णू पेडणेकर यांच्या शेतविहिरीत ही डुक्करे पडली होती. पेडणेकर हे गुरूवारी सायंकाळी फळ बागेतील झाडांना पाणी घालण्यासाठी गेले असता काहीतरी कुजल्याचा त्यांना वास आला. त्यांनी विहिरीत डोकावले असता डुक्करे मेलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना दिसून आली. ही बाब देवरूख वनविभागाला कळताच शुक्रवारी दुपारी वनविभागाचे कर्मचारी जेसीबी घेऊन घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने या डुक्करांना विहिरीतून बाहेर काढत विल्हेवाट लावण्यात आली.