रत्नागिरी, दि ४ (जिमाका) : नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत घेतलेल्या कामांची भौतिक, आर्थिक उद्दिष्ट, झालेले साध्य आणि फलनिष्पत्ती शासनास सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, उपवनसंरक्षक गिरीजा देसाई, जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ. भास्कर जगताप आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा नियोजन अधिकारी श्री. मुळे यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी प्रत्येक विभागाचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, नियोजन विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी पाठविलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. वेळेवर प्रशासकीय मान्यता देण्याच्या अनुषंगाने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून नियोजन अपेक्षित आहे. 30 सप्टेंबर पर्यंत किमान 75 टक्के निधीच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देऊन निधीची मागणी करण्याचे निर्देश दिले आहेत. योजनेंतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या कामांच्या ठिकाणी कामांच्या माहितीदर्शक फलक लावण्यात यावा. जिल्हा शल्यचिकित्सकांनी ग्रामीण रुग्णालय, उपविभागीय रुग्णालयांच्या दुरुस्तीस प्राधान्य द्यावे.