तुरळ येथील विघ्नेश करंडे या तरूणाचे अपघाती निधन; कुटुंबाने कर्ता मुलगा गमावला करंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला; तुरळ गावावर शोककळा पसरली..

Spread the love

संगमेश्वर- मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हरेकरवाडी जवळ बोलेरो पिकअप गाडीची दुचाकीला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात तुरळ पाचकलेवाडीतील विघ्नेश आत्माराम करंडे (वय-२१) या तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बोलेरो चालक व त्यातील अन्य तीन प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात आज बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे. दरम्यान विघ्नेशच्या अपघाती मृत्यूने तुरळसह संगमेश्वर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विघ्नेश करंडे हा पँशन प्रो या मोटारसायकलवरून (MH-08 AB / 4692) आरवलीहून तुरळच्या दिशेने येत होता. त्याची मोटारसायकल तुरळ हरेकरवाडी जवळ आली असता चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो (MH-08 W / 3563) गाडीची दुचाकीला जोरदार धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती कि, मोटारसायकलचे पुढील चाक तुटले. तर विघ्नेश दूरवर फेकला गेला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातानंतर बोलेरो ही रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. बोलेरोचा चालक परेश हेमंत देवरुखकर (४१, रा. धामणी) व बोलेरोमधून प्रवास करणारे सिया समीर सकपाळ (२६, रा. धामणी ), रियांश समीर सकपाळ (३ वर्षे, रा. धामणी) व पल्लवी सिताराम धामणाक (२४, रा. धामणी) हे जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी, पो. काँ. विश्वास बरगाले, चालक सचिन जाधव, खाडे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. अपघातात मृत झालेल्या विघ्नेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, विघ्नेशच्या अपघाती मृत्यूची बातमी तुरळ परिसरात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर विघ्नेशच्या मृत्यूने तुरळ परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाती मृत्यू झालेला विघ्नेश आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील आजारी असतात. त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. तो कुटुंबाची जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडत होता. तो धामणी येथील पेट्रोल पंपावर कामाला होता. मात्र बुधवारी मोटारसायकलने प्रवास करत असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. बोलेरोच्या धडकेत त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. त्याच्या अपघाती मृत्यूने करंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर तुरळ गावावर शोककळा पसरली आहे. तर शांत स्वभावाच्या विघ्नेश करंडे याचा अपघाती मृत्यू सर्वांच्याच मनाला चटका लावून गेला आहे.

Author


Spread the love

You cannot copy content of this page