जनशक्तीचा दबाव न्यूज | पिरंदवणे | फेब्रुवारी १८, २०२३.
आज महाशिवरात्रिच्या निमित्ताने संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे येथे स्थित श्री देव गांगेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्सव साजरा करण्यात आला. भगवान गांगेश्वरावरील अभिषेकादी धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य श्री. अरूण भोळे गुरूजी यांनी केले. श्री. योगेश मुळे यांनी यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात भक्तिभावाने पूजा केली. यावेळी गावचे मानकरी श्री. अरविंद मुळे, नियमित पुजारी श्री. सदानंद लिंगायत, गावकर श्री. जयराम घेवडे, गावकर श्री. गोविंद धोपट आणि अन्य प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.
यानंतर ह.भ.प. सौ. सायली मुळ्ये-दामले यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. ‘देव-देश-धर्म, भक्ती हेची कर्म’ या अभंगाचे निरूपण करताना त्यांनी उद्या होणार्या शिवजयंतीचे औचित्य साधून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आख्यान सांगितले. यावेळी विविध दृष्टांत आणि समर्थवचने देत त्यांनी आपला विषय उपस्थितांसमोर मांडला.
कीर्तनानंतर श्री. अरविंद मुळे यांनी कीर्तनकार व त्यांचे साथीदार श्री. कैलास दामले व श्री. दिनेश काळे यांचे आभार मानले. तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केले अशा सर्वांचे आभार मानले. महाशिवरात्रीच्या निमित्ताने खिचडी प्रसादाचे वाटप झाले अशाप्रकारे अत्यंत भक्तीमय वातावरणात हा उत्सव संपन्न झाला.