रत्नागिरी, दि. २५ : कोकणातील पदवीधर तरुण व स्पर्धा परीक्षार्थींना नोकरीची संधी, पर्यटन व्यवसायाला पाठबळ आणि कोकणाच्या सर्वांगीण विकासाची खात्री देणारे `व्हिजन डॉक्युमेंट’ आमदार निरंजन डावखरे यांनी जाहीर केले आहे. तसेच कोकणाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपासह महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची या मतदारसंघात दुसरी टर्म झाली असून, ते आता हॅट्रिकसाठी सज्ज झाले आहेत. आगामी सहा वर्षाच्या काळात कोकणातील पाचही जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या विकासकामांचे `व्हिजन डॉक्युमेंट’ जाहीर केले आहे.
या व्हिजन डॉक्युमेंट'मध्ये
मिशन एज्युकेशन’ नुसार विद्यार्थी, संस्थाचालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाची पावले ओळखून नवीन शैक्षणिक धोरण आखले आहे. त्यानुसार बदलत्या काळानुसार हायस्पीड इंटरनेट, डेटा व्यवस्थापन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांनी आणलेल्या क्रांतीचे आव्हान पेलण्यासाठी कौशल्य विकास, नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
कोकणातील पाचही जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाला नवीन शैक्षणिक धोरणाचे प्रशिक्षण देण्यासाठी समन्वय, नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक शाळेत डिजिटल रुम आणि रोबोटिक्स लॅब तसेच इलेक्ट्रॉनिक गॅझेट्ससाठी अखंड विजेची सुविधा, शासकीय योजना आणि मेडा'च्या योजनांसाठी समन्वय साधून कोकणातील पाचही जिल्ह्यातील शाळा पुढील सहा वर्षांत टप्प्याटप्प्याने ग्रीन स्कूल, कोकणातील प्रत्येक मुलाला उत्तम शिक्षण आदी
व्हिजन’मध्ये मांडण्यात आले आहे.
एमपीएससी, युपीएससी व अन्य स्पर्धा परिक्षांसाठी जिल्हानिहाय व तालुकानिहाय मार्गदर्शन केंद्र स्थापन करून त्यात ग्रंथपाल व इंटरनेट सुविधा उपलब्ध करणार, पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नती गती देणार, राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत, अशी ग्वाही `व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये देण्यात आली आहे.
स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा केंद्राची स्थापना झाल्यानंतर तालुका स्तरावर सुविधा, पदवीधर शिक्षकांसाठी सेवा व पदोन्नती, पदवीधर शिक्षकांचे वेतनविषयक प्रश्न, पदवीधर शिक्षकांच्या विविध समस्या, कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी एकात्मिक मध धोरण, मच्छिमारांसाठी मत्स्योद्योग धोरण, फळांवरील प्रक्रिया उद्योगाला वेग, पुष्पशेतीच्या प्रगतीसाठी पुढाकार आदींबरोबरच कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ सुरू करण्याचा संकल्प आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे.