रत्नागिरी, दि. 21 (जिमाका) : योग ही जीवन प्रणाली असून, ती अंगीकारली पाहिजे. निरामय जीवनासाठी योग अत्यंत महत्वाचा आहे. त्यामध्ये सातत्य ठेवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आणि योग असोसिएशन यांच्या सहकार्याने येथील जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन आज झाला. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे, तहसिलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा सांख्यिकी उपसंचालक निवास यादव, स्काऊट गाईड संघटक रमाकांत डिंगणे आदी उपस्थित होते.
सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन योगदिनाचा प्रारंभ करण्यात आला. रा. भा. शिर्के प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार आणि योगासनांचे प्रात्याक्षिक सादर केले. राजेश आहिरे यांनी सूत्रसंचलन करत, उपस्थितांकडून योगासने करवून घेतली. ताडासन, भद्रासन, त्रिकोणासन, वज्रासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, मंडुकासन, सशांकासन, मकरासन, शवासन या आसनांबरोबरच कपालभाती, अनुलोम विलोम, शीतली आदी प्राणायामचे प्रकारही उपस्थितांनी केले.
सूर्यनमस्कार स्पर्धेतील विजेते स्वस्ती पावसकर, स्वरा मांडवकर, पूर्वा साळवी, आयुषी क्षेत्री, पियुषा पाटील, सोहम बंडबे, वंश शिंदे, वरद पवार, राधिका पेडणेकर, आदिती चव्हाण, रुबीना सय्यद, श्रावणी शिवगण, प्रणिता लवटे, सांची धनावडे, रत्नेश आडविरकर, विनायक डांगे, निखिल चव्हाण, संकेत शिंदे यांना प्रशस्तीपत्र देण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. अ. दा. नाईक हायस्कूल, अ. के, देसाई हायस्कूल, स्काऊट गाईडचे विद्यार्थी आणि शिक्षक आजच्या योगदिनात सहभागी झाले होते.