लखनौच्या अकबरनगरमधील बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. १० जूनपासून सुरू करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एकूण १३२० बांधकामे पाडण्यात आली असून आता मलबा हटवण्याचे काम सुरु आहे. अकबरनगरमधील अतिक्रमणाच्या शेवटच्या कारवाईत काल ( १९ जून) चार मजली असलेल्या दोन मशिदी जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
कुकरेल नदीकाठच्या जमिनीवर करण्यात आलेली बेकायदा बांधकामे एलडीए, महापालिका आणि प्रशासनाच्या पथकाने जमीनदोस्त केली असून आता डेब्रिज हटवण्याचे काम सुरू आहे. या काळात अधिकाऱ्यांचे पथक सतर्क राहिले. यावेळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात होते. अकबर नगर परिसरात काही बेकायदे मंदिरेही होती, परंतु लोकांची परवानगी घेऊन ती पाडण्यात आली. मंदिरावर कारवाई करण्याअगोदर मंदिरातील देवांच्या मूर्ती इतर मंदिरात ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यासह मोठ्या प्रमाणात असलेल्या इमारती, घरे आणि मशिदी देखील पाडण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रशासनाने आता हा संपूर्ण परिसर मोकळा केला असून मलबा हटवण्याचे काम आता सुरु आहे.
अतिक्रमणाच्या शेवटच्या कारवाईत बेकायदा बांधकाम असलेल्या दोन मशिदींवर बोल्डोजर चालवून जमीनदोस्त करण्यात आले आहेत. यामध्ये एक मशीद आणि दुसरी मदरसा होती. ही कारवाई करत असताना प्रशासनाने खबरदारी घेतली होती. मशिदी पाडत असताना अकबरनगरमधील पोलिसांनी आसपासचा परिसर सील केला होता. रस्ता बंद करण्यात आला. तसेच फ्लायओव्हर ब्रिजवर लोकांना थांबण्यास आणि फोटो काढण्यास बंदी घालण्यात आली. यानंतर बुलडोजर आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने मशिदी जमीनदोस्त करण्यात आल्या.