नेरळमध्ये शिंदे,ठाकरे गटात राडा,पोलीसांचा कडक बंदोबस्त

Spread the love

नेरळ (प्रतिनिधी) केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे पडसाद नेरळमध्ये उमटले असून,ठाकरे गटाच्या कार्यालयावर शिंदे गटाने ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन्ही गट आमनेसामने आल्याने येथील वातावरण तंग झआले. नेरळ येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करणार्‍या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर नेरळ पोलीस ठाणे येथे घरफोडी आणि लूटमारीच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे.

शिंदे गटाचे अमर मिसाळ, अंकुश दाभणे, अंकुश शेळके, प्रभाकर देशमुख आदीसह अन्य कार्यकर्ते यांनी मध्यवर्ती कार्यालयाला लावण्यात आलेले लोखंडी टाळे हे लोखंडी हत्याराने तोडले आणि प्रवेश केला.त्याबद्दल फोटो व्हायरल झाल्यावर नेरळ मधील शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक यांनी मध्यवर्ती कार्यालय गाठले. त्यावेळी तेथे कोणीही नव्हते आणि त्यानंतर शाखा कार्यालय उघडून पाहिले असता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटोंची नासधूस झाल्याचे तसेच शाखा कार्यालयात असलेली तिजोरी तेथून गायब झाली असल्याचे आढळून आले.

या घटनेनंतर कर्जत तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी यांनी नेरळ शाखा कार्यालय येथे गर्दी केली. सुवर्णा जोशी, उत्तम कोळंबे, बाबू घारे यांच्यासह नेरळ परिसरातील उपस्थित होते.त्यानंतर नेरळ शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांनी नेरळ पोलीस ठाणे गाठून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावेळी अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

नेरळ येथील हाजी महमद नसीम गुलाबनबी नजे यांनी जमीन शिवसेना शाखा कार्यालयासाठी जमीन बक्षिसपत्र दिली आहे. सध्या या जमिनीची मालकी रवींद जाधव आणि संजय यांच्या नावे असून रवींद्र जाधव यांचे निधन झाले असल्याने त्यांच्या मुलांचा वारस म्हणून नोंद झाली आहे. त्यामुळे खासगी जमिनीवर असलेल्या नेरळ शिवसेना शाखा कार्यालय आणि मध्यवर्ती कार्यालय मध्ये बेकायदा घुसून तसेच तेथील वस्तूंची नासधूस केली.तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिक आणि कार्यकर्ते यांनी जमा केलेली वर्गणी तसेच गुरू दक्षिणा तिजोरी फोडण्यात आली आहे. त्यामुळे त्या तिजोरी मधील मोठी रक्कम गायब झाली असल्याचा आरोप शहर प्रमुख हेमंत तथा बंडू क्षीरसागर यांनी केला आहे. त्यामुळे बेकायदा ताबा घेऊन तेथील मुद्देमाल आणि वस्तूंची हेराफेरी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लेखी निवेदन देवून केली आहे.घटना घडल्या पासून नेरळ पोलीस यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

शनिवारी सकाळी सकाळी दहा वाजता पोलिसांनी पंचनामा करून घेतला आहे.यावेळी तक्रारदार नेरळ शहर प्रमुख हेमंत क्षीरसागर हे कार्यालयात होते. पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी क्षीरसागर यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.मात्र कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता, त्यामुळें नेरळ पोलिसांवर दबाव असल्याचे शिवसैनिक बोलत आहेत. गटाच्या कार्यकर्त्यांवर घरफोडी आणि दरोडा हे गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे प्रमुख यांनी नेरळ पोलिसात केली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page