हिम्मत असेल तर मैदानात या; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

Spread the love

मुंबई (प्रतिनिधी) निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेबरोबरच धनुष्यबाणही दिल्याने शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कमालीचे आक्रमक आणि संतप्त झाले आहेत. हिम्मत असेल तर निवडणुकीच्या मैदानात जनताच तुमचा सोक्षमोक्ष लावेल, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपला दिलेला आहे. मातोश्रीबाहेर गाडीच्या टपातून उपस्थितांना मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी मोदी सरकार, केंद्रीय निवडणूक आयोग आणि शिंदे सरकारवर यथेच्छ टीकास्त्र सोडले. यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही सन 1969 मध्ये शिवसेना स्थापन झाली त्यावेळीही मुंबईत असेच गाडीच्या टपावर उभा राहून भाषण केले होते.

महाशिवरात्र आहे, मात्र आपलं शिवधनुष्य चोरीला गेलं आहे. या चोरांना आम्ही धडा शिकवणार आहोत. आपण सगळ्यांनी या चोरांना धडा शिकवू. मी या चोरांना आव्हान देतो आहे की, तुम्ही जो धनुष्यबाण चोरला आहे तोच धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरे या, मग बघू जनता कुणाला निवडणार? असं खुलं आव्हानच उद्धव ठाकरेंनी एकनाथ आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गटाला दिलं आहे.

याबाबत सर्वोच्च न्यायालयात आम्ही धाव घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच पक्षाचं नाव गेलं आणि चिन्ह गेलं म्हणजे शिवसेना संपली असं कुणीही समजू नये. ज्यांनी आधी माझे वडील चोरले अशा चोरांना महाशक्ती प्रतिष्ठा देऊ पाहते आहे मात्र चोर तो चोरच असतो अशा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

उद्धव ठाकरे यांनी आता कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी आणि आपली लढाई नव्याने सुरू करण्यासाठी कंबर कसली आहे. पत्रकार परिषदेतही त्यांचा आक्रमकपणा दिसून आला. तसाच तो आज मातोश्रीच्या बाहेरही दिसला. तिथे जमलेल्या लोकांनीही उद्धव ठाकरेंच्या नावाने घोषणाबाजी करत आम्ही तुमच्यासोबत आहोत असं म्हटलं आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page