मुंबई l 12 जून- राज्यात भाजीपाल्यासह कांद्याचे भाग वाढले असून २० तो ३० रुपये किलो दराने मिळणारा कांदा आता किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये किलोने विकला जात आहे. वाशीच्या बाजारसमितीमध्ये सध्या कांद्याची आवक कमी झाल्यामुळे हे दर वाढले असून पावसाळ्यासाठी साठवलेला कांदा बाहेर काढल्यानंतर हे दर कमी होण्याची शक्यता आहे.
वाशीच्या बाजारात दररोज १३५ ट्रक कांदा येत असतो. मात्र सध्या या बाजारात केवळ ७० ट्रक कांद्याचीच आवक होत आहे. पावसाळ्यासाठी व्यापाऱ्यांनी कांदा साठवून ठेवला असून हा साठवलेला कांदा बाजारात आल्यानंतर कांद्याचे भाव आटोक्यात येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कांद्याबरोबरच बटाटा, लसूण यांच्याही दरात वाढ झाली असून टोमॅटो ८० रुपये किलोवर गेला आहे. या भाववाढीमुळे गृहिणींचे घरगुती बजेट कोलमडले आहे.