दहा वर्षात प्रगती झाली, पण प्रश्न सुटले नाहीत: वर्षभरापासून मणिपूर अशांत, तिकडं लक्ष द्या, सरसंघचालकांनी टोचले कान….

Spread the love

देशातील निवडणुका संपल्या आहेत, आता सरकार स्थापन झालं. त्यामुळे जे घडलं ते का घडलं, यात संघाची लोक पडत नाही. मात्र राजकारण्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी असत्याचा वापर केला, अशी टीका सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली. मणिपूर मागील एक वर्षापासून जळत आहे, तिकडं लक्ष देणं गरजेचं आहे, असंही सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं.

नागपूर Mohan Bhagwat On Manipur Crisis : देशाची निवडणूक पार पडली आहे, निकालही आले आहेत आणि आता सरकारही स्थापन झालं. निवडणुकीची चर्चा अजूनही सुरू आहे. जे झालं, का झालं, कसं झालं, याची चर्चा सुरू आहे. निवडणूक प्रत्येक 5 वर्षानंतर घडणारी आपल्या देशातील महत्वपूर्ण एक घटना आहे. त्याचप्रमाणं ती घडते. त्याचे काही नियम आहेत, त्याचे काही डायनामिक्स आहेत. त्याच अनुषंगानं ती घडत असते. समाजानं आपलं मत दिलेलं आहे. त्यानुसार आता सर्व काही होईल. आता असं का झालं, का घडलं यात आम्ही संघाचे लोक पडत नसल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले. ते सोमवारी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर आयोजित कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोपीय सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांचे कानही टोचले.

निवडणूकीत स्पर्धा करा पण मर्यादा पाळा : आम्ही आपलं राष्ट्रीय कर्तव्य करत असतो. मत देतो, प्रत्येक निवडणुकीत ते करतो. मात्र, असंच का झालं, का घडलं याच्या चर्चेत आम्ही पडत नसल्याचं सरसंघचालक मोहन भागवत म्हणले. निवडणूक म्हणजे दोन पक्ष असणारचं, त्यामुळे त्यांच्यात स्पर्धा असते. ते एकमेकांना मागंपुढं करण्याचा प्रयत्न करतात आणि ते केलंही पाहिजे. मात्र त्यातही मर्यादा सर्वांनी पाळली पाहिजे. एकमेकांना मागं करण्यासाठी असत्याचा वापर करायला नको. नेतृत्व निर्माण झालंय मात्र, नेतृत्वाला समाजाची साथ मिळणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

मर्यादेचे पालन झालं नाही : “प्रचारात ज्या पद्धतीनं चुकीचं वक्तव्य करण्यात आलं, अश्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होईल, याचा देखील विचार करण्यात आला नाही. यामध्ये आम्हाला नाहक ओढण्यात आलं. टेक्नॉलॉजीचा वापर करून असत्य मांडण्याचा प्रयत्न झाला, ते योग्य नाही. निवडणूक लढताना एक मर्यादा असते, त्या मर्यादेचं पालन झालं नाही,” असंही सरसंघचालक म्हणाले.

दहा वर्षात देशात प्रगती झाली पण प्रश्न सुटलेलं नाहीत : “देशात एनडीएचं सरकार परत आलय. देशात गेल्या 10 वर्षात बरंच काही चांगलं झालं. आर्थिक क्षेत्रात, संरक्षण क्षेत्रात आमची प्रगती झाली. मात्र, अजूनही प्रश्न संपलेले नाहीत. निवडणुकीत जो काही अतिरेक झाला, त्याच्या पुढं जाऊन आता आम्हाला विचार करायचा आहे.”

मणिपूरकडं लक्ष देण्याची गरज : 10 वर्षे शांत राहिलेलं मणिपूर गेल्या वर्षापासून अशांत आहे. गेले दहा वर्ष तिथं शांतता होती. अचानक तिथं अशांतता घडली. तिथं जे काही झालं, ते घडलं आहे की घडवलं आहे, असा प्रश्न आहे. तिकडं लक्ष देणं गरजेचं आहे. एखाद्या सधन घरातील महिला मद्यपान करून वाहन चालवतात आणि लोकांना चिरडतात. कुठं चालली आहे आपली संस्कृती. जगात ज्यांनी संस्कृती तयार केली, त्यांची ही स्थिती चांगली नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सामाजिक समता शिकण्यासाठी संघाच्या शाखेत या : भारताच्या वैविध्यामध्ये ऐक्य आहे. आपली पूजा पद्धती मान्य करता, तर इतरांची पूजा पद्धती ही मान्य केली पाहिजे. अनेक शतकं अस्पृश्यता पाळली. कुठं ही वेद, धर्मग्रंथात त्याचा उल्लेख नव्हता, तरी ते घडलं. हजारो वर्ष अस्पृश्यता पाळली गेली, त्यामुळे त्याबद्दल नाराजी आहे. झालेल्या अन्यायाबद्दल नाराजी आहे, त्यामुळेच आपलेच काही लोक रुसलेले आहेत. रोटी, बेटी, भेटणं, एकमेकात मिसळणं सर्व व्यवहार होणं आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक समता शिकायची आहे, तर संघाच्या शाखेत यावं, असं डॉ. मोहन भागवत म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page