नवीदिल्ली- लोकसभा निवडणुकीत मोठं बहुमत मिळाल्यानंतर एनडीएने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. एनडीएने राष्ट्रपतींना पाठिंब्याचे पत्र सादर केले आहे. यातच नरेंद्र मोदी हे ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीची जोरदार तयारी भाजप आणि मित्रपक्षांकडून सुरू करण्यात आली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 543 सदस्यांच्या लोकसभेत भाजपला 240 जागा मिळाल्या, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 293 जागा मिळाल्या. एनडीएच्या जागांची संख्या बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त आहे. याआधी एनडीएची आज बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी म्हणाले, युतीच्या इतिहासातील संख्येच्या दृष्टीने पाहिल्यास हे सर्वात मजबूत आघाडीचे सरकार आहे. विरोधी पक्षांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान म्हणाले की, आम्ही कधीही हरलो नाही. 4 जूननंतरचे आमचे आचरण दाखवते की, आम्हाला विजय कसा पचवायचा हे माहित आहे.
एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर ते म्हणाले, हा विजय न स्वीकारण्याचा आणि या विजयावर पराजयाची सावली पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण असे सर्व प्रयत्न फसले. अशा गोष्टी लवकर संपतात आणि तेच घडते. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) एन चंद्राबाबू नायडू, जनता दलचे (युनायटेड) नितीश कुमार, लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) चिराग पासवान, जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे एचडी कुमारस्वामी, अपना दलच्या (एस) अनुप्रिया पटेल, जनसेना पक्षाचे पवन कल्याण आणि भाजपचे नवनिर्वाचित सदस्य आणि एनडीएच्या इतर मित्रपक्षांनी सहभाग घेतला.