नवी दिल्ली | 5 जून- २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आलाय. चारसौ पारचे स्वप्न पाहणाऱ्या मोदींच्या एनडीएला २९२ वर समाधान मानावे लागले आहे. तर कॉंग्रेसप्रणीत इंडिया आघाडीने मुसंडी मारत अनपेक्षित पणे २३४ चा आकडा गाठलाय.आता सत्तास्थापनेचा खरा खेळ सुरू झालाय. एनडीए मध्ये असणाऱ्या नितीश कुमार यांना महत्त्व आलं आहे. आणि हे नितीश कुमार एनडीए मध्ये आहेत याबद्दल भाजप नेते विनोद तावडे यांना मनातल्या मनात धन्यवाद देत आहेत.
जर विनोद तावडे नसते तर ?
साल २०१९. एकेकाळी भाजपच्या भावी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत समजल्या जाणाऱ्या विनोद तावडे यांचं विधानसभेच तिकीटच कापलं गेलं होतं. विरोधकांनी खिल्ली उडवली, तावडेंच राजकारण संपलं अशी चर्चा सुरू झाली.
तेव्हा तावडेंनी सुरेश भटांची एक गाजलेली कविता सोशल मिडियावर प्रसिद्ध केली. ‘विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही….’ या कवितेमुळे राज्यातील बलदंड नेत्यावर आरोप व्हायला लागले. पुढे तावडेंनी आपलं लक्ष राज्यातून दिल्लीकडे वळवलं.
पाच वर्षांपूर्वी विधानसभेचे तिकीट न मिळाल्यानंतर राजकारणात अंग चोरून वावरणारे तावडे हे शांतपणे काम करत राहिले. मोदी अमित शाह यांचा विश्वास संपादन केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस, सोबतच आधी हरयाना आणि पुढे बिहारचे प्रभारी बनले.
राजकीय कारकीर्द संपली अशी चर्चा सुरू असताना तावडे मात्र “पुन्हा आले”
साल २०२३. मोदींच्या विरोधकांनी लोकसभेच्या तयारी साठी इंडिया आघाडी उघडली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या आघाडीला साकारण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होते. नितीश कुमार यांना अपेक्षा होती की त्यांना इंडिया आघाडीच संयोजक पद मिळेल आणि ते पुढे सत्ता आली तर पंतप्रधान होतील. पण जुलै मध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत त्यांचा अपेक्षाभंग झाला. ते नाराज होऊन पाटण्याला परत आले. नितीश कुमार यांच्या नाराजीला भडाग्नी दिला विनोद तावडे यांनी.
पलटूराम म्हणून कुख्यात असणारे नितीश कुमार हे यापूर्वी देखील अनेकदा भाजप सोबत सत्तेत राहून गेले होते. त्यांची समजूत काढून लोकसभेच्या तोंडावर इंडिया आघाडी खिळखिळी करण्याची संधी तावडे यांनी गमावली नाही.
एका मुलाखती मध्ये ते सांगतात,
बंगळुरू येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची पंतप्रधनपदाचा उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. तेव्हा नितीश कुमार यांना समजलं की, आपल्याला या लोकांनी वापरून घेतलं आहे. तिथे नितीश कुमार यांची जी मानसिकता होती, त्या मानसिकतेचा आम्ही स्वाभाविकपणे लाभ घेण्याचा प्रयत्न केला. त्यादृष्टीने आम्ही त्यांच्याशी संवाद सुरू केला. परंतु, चर्चेची गाडी पुढे जात नव्हती. परंतु, जेव्हा लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या १० आमदारांना राजदबरोबर घेऊन तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवण्याचा प्रयत्न केला गेला ती गोष्ट नितीश कुमार यांना खटकली. त्याचबरोबर आम्हालाही ते चालणार नव्हतं.”
तावडे यांची पडद्याआडची खेळी यशस्वी ठरली.
२०२४ उजाडता उजाडता त्यांनी नितीश कुमार यांना फोडलं. जानेवारी महिन्यात पलटी मारून नितीश कुमार एनडीए मध्ये सामील झाले. तिकीट ण मिळाल्यामुळे ज्यांच्या कडे दुर्लक्ष होत होतं त्या विनोद तावडे यांना मोदींचा संकटमोचक म्हणून देशभरातील मीडिया कौतुक करू लागली.
तिकीट वाटप असो की पक्ष फोडाफोडी विनोद तावडे यांच्या शब्दाला भाजपमध्ये वजन आलं. महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपामागे सुद्धा तावडे यांचा अहवाल आहे असं बोललं गेलं. पक्षाचे महामंत्री म्हणून प्रेस कॉन्फरन्समध्ये मोदींच वाराणसी मधून तिकीट जाहीर करताना तावडे दिसले.
मोदी सरकारसाठी तारणहार
लोकसभेच्या निकालानंतर नितीश कुमार यांचं आणि त्यांच्या १२ खासदारांच महत्त्व वाढलं आहे. २७२ चा आकडा न गाठल्यामुळे मोदींना एक हाती सत्ता स्थापन करणे शक्य नाही. भले एनडीएकडे बहुमत असले तरी भाजपच्या वैयक्तिक जागा २४० इतक्या कमी झाल्या आहेत. जर चंद्राबाबू नायडू यांची तेलगू देसम पार्टी आणि नितीश कुमार यांची जेडीयू जर एनडीए मध्ये नसतील तर मोदींचे पंतप्रधान पद धोक्यात येऊ शकते. नितीश कुमार यांना इंडिया आघाडीतून फोडून सत्ता एनडीए आघाडीमध्ये आणणारे विनोद तावडे हे मोदींचे संकटमोचक ठरले आहेत हे नक्की.