रत्नागिरी प्रतिनिधी:- रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायाकरीता सगळ्यात महत्त्वाचे इंधन लागते ते म्हणजे डिझेल. जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांकडून नोंदणीकृत मासेमारी व्यावसायिकांना डिझेल पुरवले जाते. त्या बदल्यात शासनाकडून मच्छीमारांना डिझेल परतावा दिला जातो. कोकणात सर्वाधिक मासेमारी करणारा जिल्हा म्हणून रत्नागिरीची ओळख आहे. यावर्षी म्हणजेच आर्थिक वर्षात जिल्ह्यातील मच्छीमारांकडून १३५७६.१७ किलो लिटर एवढ्या डिझेलची उचल करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे २८ मच्छीमार सहकारी संस्था आहेत. त्यांच्याकडे १२४५ एवढ्या मच्छीमारी नौकांची नोंदणी आहे.
आणि या नौका मालकांनी १३५७६.१७ किलो लिटर एवढी डिझेलची उचल केली आहे. काही मासेमारी नौका खाजगी पातळीवर सुद्धा डिझेल खरेदी करतात. मत्स्य आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या मासेमारी नौका मालकांना डिझेल कोटा मंजूर झालाय त्यांचेच डिझेल परताव्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येतात. आणि त्यानंतर त्यांना डिझेल परतावा मिळतो. त्यामुळे जरी मच्छीमारांकडून यावर्षी मासेमारीचा चांगला व्यवसाय झाला नाही अशी ओरड करण्यात येत असली तरी डिझेल खरेदीचा आकडा काही वेगळीच बाब पुढे आणत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मच्छीमार अगदीच घाट्यात नाहीत असे म्हणणे काहीच वावगे ठरणार नाही.