लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 9 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात पाच केंद्रीय मंत्री आणि दोन माजी क्रिकेटपटूंसह एकूण 1,717 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज (13 मे) मतदान होत असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदारांना मतदान करता येईल. या टप्प्यात 9 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांसाठी एकूण 1,717 उमेदवार रिंगणात आहेत.
चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेशच्या सर्व 25 जागा, तेलंगणाच्या एकूण 17, उत्तर प्रदेशच्या 13, महाराष्ट्राच्या 11, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या 8-8, छत्तीसगडच्या पाच, झारखंड आणि ओडिशाच्या 4-4 जागा आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे. त्याच वेळी, आंध्र प्रदेशातील एकूण 175 विधानसभा जागांवर आणि ओडिशातील 28 विधानसभेच्या जागांवर मतदान होणार आहे.
पाच केंद्रीय मंत्री रिंगणात…
चौथ्या टप्प्यात मोदी सरकारचे पाच मंत्री – गिरीराज सिंह (बेगुसराय), अजय मिश्रा टेनी (खेरी), जी किशन रेड्डी (सिकंदराबाद), नित्यानंद राय (उजियारपूर) आणि अर्जुन मंदा (खुंटी). सपा अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (कनौज), एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी (हैदराबाद), अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (आसनसोल), माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण (बेहरामपूर), कीर्ती आझाद (वर्धमान), माधवी लता (हैदराबाद), वायएस शर्मिला. (कुड्डापह), महुआ मोईत्रा (कृष्णनगर) हे हेवीवेट उमेदवारही आपलं नशीब आजमावत आहेत.
2019 च्या तुलनेत कमी मतदान…
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांमध्ये, मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत घट झाली आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात 102 जागांवर 66.1 टक्के मतदान झालं होतं. 26 एप्रिल ला दुसऱ्या टप्प्यात 88 जागांवर 66.7 टक्के मतदान झालं होतं, तर 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर 65.68 टक्के मतदान झालं होतं. त्यामुळं आता चौथ्या टप्प्यात मतदानाच्या टक्केवारीत वाढ होईल का?, हे पाहणं महत्त्वाचं असेल.