अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयानं आज (10 मे) निकाल जाहीर केलाय. तब्बल 11 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आलाय.
पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आज (10 मे) पुण्यातील विशेष न्यायालयात अंतिम निर्णय दिला. पुणे सत्र न्यायालयानं विरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची निर्दोष सुटका केली आहे. तर न्यायालयानं सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेसह पाच लाखांचा दंड सुनावलाय.
🔹️गोळ्या झाडून करण्यात आली होती हत्या….
डॉ. नरेंद्र दाभोलकर हे पुण्यातील महर्षी रामजी विठ्ठल शिंदे ब्रिजवर मॉर्निंग वॉकला गेले असताना 20 ऑगस्ट 2013 रोजी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी अगदी जवळून त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. यातील एक गोळी डॉ. दाभोलकरांच्या छातीत, तर दुसरी डोक्यात लागली होती. या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं होतं.
सुरुवातीला पुणे पोलीस याप्रकरणाचा तपास करत होते. त्यानंतर 2014 ला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडं (सीबीआय) सोपविण्यात आला. 15 सप्टेंबर 2021 ला शरद कळसकर, सचिन अंदुरे, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर दाभोलकर हत्येप्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले. तसंच सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात 20 साक्षीदार तपासले. तर बचाव पक्षाकडून वकील प्रकाश साळसिंगीकर, वीरेंद्र इचलकरंजीकर, सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहात न्यायालयात दोन साक्षीदार उभे केले होते. या खटल्याचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर आज दाभोलकर हत्या प्रकरणी निकाल लागला.
🔹️न्यायालयानं काय म्हटलंय?…
या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालय म्हणाले, कोणाचाही खून होणं ही दुर्देवी घटना आहे. साक्षीदाराची उलट तपासणी घेताना आरोपीच्या वकिलांकडून खुनाचे समर्थन करण्याची वक्तव्य करण्यात आली ती दुर्देवी आहेत. त्यावर त्यांनी विचार करावा असं निरीक्षण न्यायालयानं नोंदविले.