नरेश म्हस्के यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळं ठाण्यातही भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळं भाजपा नेत्यांनी मध्यस्थी करत महायुतीला मतदान करण्याचं आवाहन केलंय.
ठाणे : नवी मुंबईमधील भाजपा कार्यकर्त्यांनी दिलेल्या राजीनामा प्रकारानंतर मीरा-भाईंदरमध्ये देखील भाजपा कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलाय. आता मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात देखील भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ओकसभा निवडणुकीत भाजपाचं प्राबल्य असलेल्या या ठाणे लोकसभेवर अनेक दिवसांपासून भाजपा आणि शिंदे गटाचे दावे होते. मात्र, नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्यानं भाजपा कार्यकर्त्यांनी नाराजी वक्त केली आहे.
भाजपा नेत्यांनी केली मध्यस्ती….
आज दुपारपासून भाजपा कार्यकर्त्यांचं नवी मुंबई, ठाणे, मिरा भाईंदरमध्ये बैठकीचं सत्र सुरू आहे. त्यात संजीव नाईक यांना उमेदवारी द्यावी, म्हणून अनेकांनी आपले राजीनामा दिला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर भाजपा नेत्यांनी मध्यस्ती करत या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदी यांना जिंकून आणण्यासाठी महायुतीला मतदान करण्याचं आवश्यक असल्याचं नेत्यांनी सांगत कार्यकर्त्यांना महायुतीचा धर्म पाळण्याचं आवाहन केलं आहे.
नरेश म्हस्के यांनी घेतली भेट…
शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के यांनी आज नवी मुंबई येथील भाजपा कार्यकर्त्यांची भेट घेत, आपल्या निवडणुकीच्या प्रचाराचा आढावा घेतला आहे. त्यासोबत ठाण्यातील रेमंड ग्राउंडमधील भाजपा कार्यालयाला भेट देऊन भाजपा नेत्यांची भेट घेत पुढील प्रचाराची रणनीती आखली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते देखील उपस्थित होते. अवघे अठरा दिवस शिल्लक राहिलेल्या ठाणे लोकसभा जागेवर प्रचार करण्यासाठी नरेश मस्के यांना लवकरच नाराजी नाट्य संपून महायुतीच्या प्रचाराला लागणं आवश्यक आहे. मायावतीतील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन प्रचार केला, तरच ठाण्याचां गड राखणं शक्य होणार आहे, अशी चर्चा ठाण्यात पाहायला मिळत आहे.