यवतमाळ पुसद लोकसभा मतदार संघात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आल्याची घटना घडली आहे.
यवतमाळ : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भरसभेत भाषणादरम्यान भोवळ आल्याची घटना घडली आहे. नितीन गडकरी आज यवतमाळच्या पुसद येथे जाहीर सभेसाठी उपस्थित आहेत. एकीकडं लोकसभा निवडणुकीमुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना तर दुसरीकडं राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना सभेत चक्कर आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज यवतमाळच्या पुसद येथेही अशीच घटना घडली आहे.
नितीन गडकरींना भोवळ….
पुसदमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाषणादम्यान भोवळ आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण संबंधित घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. भरसभेत नितीन गडकरींना भोवळ येण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही त्यांना भोवळ आल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आज सभेत बोलताना त्यांना अचानक भोवळ आली. मात्र, सुरक्षा रक्षकानं नितीन गडकरी यांना तातडीनं सावरलं. त्यामुळं पुढील अनर्थ टळला.
पुसदमध्ये नितीन गडकरींची सभा….
महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारानिमित्त आज यवतमाळच्या पुसदमध्ये नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार नितीन गडकरी सभेसाठी आले. त्यांनी भाषणाची सुरवात केल्यानंतर काही वेळातच त्यांना भोवळ आली. त्यामुळं काही काळ गोंधळ निर्माण झाला. नितीन गडकरींना भोवळ येताच त्यांच्या अंगरक्षकानं त्यांना पकडलं. इतरांनी लगेच त्यांना पाणी दिलं. यानंतर नितीन गडकरींना खुर्चीवर बसवण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर त्यांना कार्यक्रमस्थळाच्या ग्रीन रुममध्ये बसवण्यात आलं. त्यांची प्रकृती स्थिर होताच त्यांनी पुन्हा भाषण केलं. तसंच त्यांनी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना भरघोष मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं.