जनशक्तीचा दबाव न्यूज
भारतातील समाज जीवनाला जागृत करण्यात संतांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. भारताचा मूळ विचार मुख्यत्वे विश्व कल्याण राहिला आहे. धर्माची शिकवण संतांनी दिली आहे व मानव कल्याणचा व्यापक विचार संतांनी मांडला आहे. अश्या महान संत परंपरेतील, एक महान संत श्री सेवालाल महाराज आहेत!
कधी काळी वैभवाच्या शिखरावर असणारा भारत, परकीय आक्रमकांच्या दास्यात पडलेला होता. अंधश्रद्धा समाजात वाढत होती. रूढी व कुप्रथा समाजात घर करून बसल्या होत्या. बळजबरीने धर्मांतरे होत होती. भारताचा तो संघर्षरत काळ होता. अश्या परिस्थितीत संत सेवालाल महाराज यांचा जन्म झाला.
संत श्री सेवालाल महाराजांचा जन्म भीमा नायक आणि माता धर्मणी यांच्या पोटी १५ फेब्रुवारी १७३९ रोजी झाला. भीमा नायक हे तांड्याचे नायक (प्रमुख) होते. ते स्वतः आपल्या धर्माप्रति जागरूक होते. भीमा नायक व माता धर्मणी यांची माता जगदंबावर अपार श्रद्धा होती. संत सेवालाल महाराज सुद्धा हे जगदंबा देवीचे भक्त होते.
निजाम गैरमुस्लिम लोकांकडून अन्यायकारक पद्धतीने करवसुली (जकात) करत होता. निजामाच्या या करप्रणालीमुळे बंजारा व्यापाऱ्यांना खूप त्रास होत असे. सेवालाल महाराजांनी निजामाच्या या अन्यायकारक करपद्धतीला कडाडून विरोध केला होता. हैदराबाद येथील निजामाच्या प्रदेशात सेवालाल महाराजांनी कर भरण्यास स्पष्ट नकार दिला होता. ‘हमारा तांडा, हमारा राज’ अशी घोषणाच महाराजांनी केली.
नवाब गुलाम खान सोबत महाराजांनी लढाई केली होती. सेवालाल महाराजांकडे अवघे नऊशे सैनिकांचा फौजफाटा होता. परंतु राष्ट्र,धर्म व स्वाभिमानासाठी त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. नवाब खानाला पराभूत होऊन माघारी जावे लागले होते.
लदेणी अर्थात व्यापार. त्याकाळी बंजारा समाजाचा मुख्य व्यवसाय. व्यापार निमित्ताने सेवालाल महाराजांनी भारतभ्रमण केले. मुघल, ब्रिटिश, निजाम हे भारतीय जनतेचे शोषण करत आहेत हे सेवालाल महाराजांच्या लक्षात आले होते. समाजाची दुर्दशा, परकीय आक्रमकांचे अन्याय व अत्याचार, वाढती अंधश्रद्धा, कुप्रथा, पशुबळी, व्यसनाधीनता, जातीभेद पाहून सेवालाल महाराजांनी समाज प्रबोधनासाठी, समाज उत्थानासाठी व समाज सुसंघटित करण्यासाठी ध्यास घेतला. त्यामुळेच सतगुरु सेवालाल महाराज समाजासाठी आजीवन ब्रह्मचारी राहिले.
समाज आपले ‘स्व’त्व कसे जागृत करेल, समाज हरवत चाललेला आत्मविश्वास कसे जागृत करेल यासाठी संत सेवालाल महाराज प्रयत्नशील राहिले. ते दीन दुःखीतांच्या सेवेसाठी समर्पित झाले होते. महाराजांनी सर्व जाती धर्मासोबत सद्भावनेचा व्यवहार ठेवला. परंतु, कधी अन्यायही👌 सहन केला नाही.
भारतीय तत्वज्ञानाची महान सनातन अवधारणा सेवालाल महाराजांनी आपल्या जीवनात उतरवली होती. ते ‘गोमातेचे रक्षक’ तसेच ‘गोप्रेमी’ होते. “खाटीकला गाय विकू नका, गोपालन करा” असा संदेश महाराजांनी दिला. पशुबळीचा विरोध करून सात्विक भक्तीचा मार्ग त्यांनी निवडला होता. सृष्टीच्या चराचरात देवाचा अंश आहे असे ते सांगत.
संत सेवालाल महाराज आजीवन अहिंसेचे पुरस्कर्ते होते, मात्र अन्याय व अत्याचार व विरोधात त्यांनी तलवार देखील उचलली होती. जुलमी राजवट व भूमाफिया विरुद्ध सेवालाल महाराजांनी आवाज उठवला. समाजबांधव धर्मांतरित होऊ नये म्हणून सेवालाल महाराजांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले. समाजाला आपल्या सनातन हिंदू संस्कृतीशी व धर्माशी जोडून सेवालाल महाराजांनी राष्ट्रसेवा केली.
वर्तमान परिस्थितीत भारतीय समाजाला चारित्र्यवान बनविण्याचे शिक्षण देणे. समरसतेच्या मार्गाने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करणे. राष्ट्राचा विचार करणे. श्रद्धा ठेवणे. अंधश्रद्धा सोडणे. ह्या सर्व बाबी संत श्री सेवालाल महाराज यांचे कार्य पुढे नेण्यासाठी व एका अर्थाने राष्ट्र पुनरुत्थानसाठी महत्वपूर्ण आहेत. बंजारा समाजातील व्यसनाधीनता व धर्मांतराचे संकट पाहता संत सेवालाल महाराज यांचे विचार दीपस्तंभाप्रमाणे आपल्या समाजाला मार्गदर्शक ठरतील, यात शंका नाही.