देवरूख- संंगमेश्वर तालुक्यातील बोंड्ये येथील प्रभावळकर कुटुंबीयांनी बांधलेल्या श्रीराम मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी प्रभू श्रीरामजन्मोत्सव सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बोंड्येत दीडशेहून अधिक वर्षांपासून रामनवमी उत्सव भक्तीभावनेने साजरा करण्यात येत आहे.
उत्सवाच्या निमित्ताने चैत्र शुक्ल नवमी दिवशी सकाळी श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. तसेच प्रथेप्रमाणे लघुरुद्र, वसंत पूजा इ. धार्मिक कार्यक्रम पार पडले. यानंतर रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार कु. वैष्णवी जोशी यांचे श्रीराम जन्मावरील कीर्तन आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण मंदिर व श्रीरामाचा पाळणा फुलांनी सजवला होता.
कीर्तन संपन्न झाल्यानंतर पाळण्यातील श्रीरामावर फुले व गुलाल उधळून रामनामाचा जयघोष करण्यात आला. महिला भाविकांनी यावेळी आरती ओवाळून पाळणा म्हटला व रामजन्म संपन्न झाला. यानंतर महाआरती करण्यात आली व देवस्थानतर्फे सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम पार पडला.
प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भक्तगणांनी गर्दी केली होती. तसेच देवस्थान कमिटीचे विश्वस्त व पुरोहितही उपस्थित होते.