संगमेश्वर : भारतीय डाक विभागाने 'आजादी का अमृत महोत्सवांतर्गत' आयोजित केलेल्या स्टॅम्प डिझाईन स्पर्धेत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील साहिल सुरेश मोवळे (१२वी वाणिज्य) याचे स्टॅम्प डिझाईन महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ट ठरले आहे. महाराष्ट्र राज्यातून केवळ ५ विद्यार्थ्यांच्या चित्राला उत्कृष्ट स्टॅम्प डिझाईन म्हणून सन्मानित करण्यात आले, यामध्ये साहिल मोवळे याच्या डिझाईनचा समावेश आहे. साहिलच्या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. साहिलच्या यशाचे कौतुक करण्यासाठी डाकघर अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी यांच्यावतीने छोटेखानी सत्काराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. आठल्ये-सप्रे- पित्रे महाविद्यालयातील
स्व. द. ज. कुलकर्णी सभागृहामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालय प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी भूषविले. प्रा. धनंजय दळवी यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ज्ञानेश कुलकर्णी (पोस्ट सहाय्यक अधीक्षक, रत्नागिरी) यांनी स्पर्धा आयोजनाचा उद्देश, स्पर्धेतील स्पर्धकांचा लाभलेला उत्स्फूर्त सहभाग याबाबत आपल्या प्रास्ताविकात माहिती दिली. श्री. ए.डी. सरंगळ (सहाय्यक अधीक्षक, मुख्यालय- रत्नागिरी) यांनी स्पर्धेविषयीचा अनुभव, स्पर्धकांमधील कलेचे सादरीकरण, पोस्टाची समाजपयोगी सेवा, पोस्टाच्या विविध योजना यामध्ये बचत, गुंतवणूक तसेच विमा आणि आधुनिक व्यावसायिक सेवा यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना टपाल खात्यामध्ये असणाऱ्या करिअरच्या संधी विशद केल्या. यानंतर साहिल मोवळे याचा श्री. ए. डी. सरंगळ यांनी रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.
प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना दैनंदिन शैक्षणिक मार्गदर्शनाशिवाय कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राबाबत आवश्यक व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले जाते. महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध कला प्रकारात गेली अनेक वर्ष राष्ट्रीयस्तरावर उत्तुंग कामगिरी करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घालत आहेत. विद्यार्थ्यांना कलाविषयक मार्गदर्शनासाठी महाविद्यालयातील शिक्षक तसेच बाहेरील तज्ञ व्यक्ती नियमित मार्गदर्शन करतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.
धनंजय दळवी यांनी केले.
साहिल मोवळे याने ‘स्वातंत्र्य लढा (FREEDOM STRUGGLE)’ या विषयावर स्टॅम्प डिझाईन करताना ‘भारतीय स्वातंत्र्य योद्धे (INDIAN FREEDOM FIGHTER)’ हा विषय हाताळला होता. साहिल याने आपल्या स्टॅम्प डिझाईनमध्ये भारतमातारुपी नकाशामध्ये भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, राजगुरू तसेच स्वातंत्र्यासाठी लढा देणारी भारतीय जनता उत्तमरीत्या चितारली आहे. साहिल याला कलाशिक्षक सुरज मोहिते, विलास रहाटे आणि प्रा. धनंजय दळवी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या कार्यक्रमाला रत्नागिरी डाक मुख्यालयातील प्रसाद जोशी, देवरुख पोस्ट कार्यालयातील श्री. बी. आर. गायकवाड, मंगेश खंदारे, रमेश गेल्ये, महाविद्यालयातील प्रा. अनंत पाध्ये, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, प्रा. शिवराज कांबळे, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. विजय मुंडेकर यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, विद्यार्थी आर्यन शिंदे, सहाय्यक स्वप्निल कांगणे आणि अमोल वेलवणकर यांनी मेहनत घेतली. साहिलच्या यशाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटो- साहिल मोवळे याच्या सत्काराप्रसंगी प्राचार्य डॉ. तेंडोलकर, सहाय्यक अधीक्षक श्री. सरंगळ, इतर मान्यवर व प्राध्यापक वृंद.
जाहिरात :