हार्बर ट्रेन बोरिवलीपर्यंत धावणार; आता हार्बर मार्गाने गाठता येणार बोरिवली…

Spread the love

मुंबई- मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मुंबईमध्ये तर पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे दिवसेंदिवस लोकलमधील गर्दी वाढताना दिसत आहे. लोकलची ही वाढती गर्दी पाहता काही वर्षांपूर्वी सीएसएमटी-वाशी, पनवेल, अंधेरी अशी ओळख असलेल्या हार्बर रेल्वेच्या विस्तार गोरेगावपर्यंत झाला. एकंदरीत गोरेगावच्या प्रवाशांना सीएमटी ते गोरेगाव प्रवास करणे सोपे झाले. यामुळे गोरेगाव-पनवेलही लोकलचा समावेश करण्यात आला आहे. आता याच हार्बर रेल्वे मार्गाचा आणखी पुढे विस्तार होणार असून हार्बर मार्गावरुन आता बोरिवलीपर्यंतचा प्रवास शक्य होणार आहे.

गेल्या काही वर्षांत अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, बोरिवलीपर्यंत प्रवाशांची गर्दी वाढत चालली आहे. याचा परिणाम लोकल गाड्यांवर दिसून येतो. सीएसएमटी येथील नोकरदारवर्गाला सीएसएमटी ते अंधेरीपर्यंत हार्बर रेल्वेने प्रवास करुन पुढे गोरेगावपर्यंत जाण्यासाठी अंधेरी स्थानकात उतरुन पश्चिम रेल्वे मार्गावरुन गोरेगाव जाणारी लोकल पकडावी लागते. प्रवाशांची हीच दगदग पाहता हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंतचा दोन टप्प्यांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी येत्या मे महिन्यात निविदा प्रक्रिया सुरु करण्याचे पश्चिम रेल्वेचे नियोजन आहे.

एप्रिल, 2023 ते मार्च, 2024 या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरार दरम्यान प्रवासी संख्येत जास्त प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे हार्बरच्या विस्ताराला गती देण्यासाठी गोरेगाव ते मालाड (2 किमी) आणि मालाड ते बोरिवली (6 किमी) असा मार्ग पूर्ण करण्यात येणार आहेत. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव अशी हार्बर लोकल धावत आहे.तर गोरेगाव ते मालाड हा पहिला टप्पा 2026-27 पर्यंत आणि मालाड ते बोरिवली हा दुसरा टप्पा 2027-28 पर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी 825 रुपये कोटी खर्च असून मे महिन्यात निविदा काढून जूनच्या आधी प्रत्यक्ष काम सुरु करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. तसेच बोरिवलीपर्यंत हार्बर विस्तारीकरणाचे प्राथमिक काम पूर्ण झाले आहे. यामध्ये भू-तांत्रिक तपासणी, सर्वेक्षण, बाधिच बांधकामे आणि झाडांचे ड्रोन सर्वेक्षण यांचा समावेश आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page