डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील दीडशे ते दोनशे मीटर परिसरात एकही फेरीवाला बसणार नाही यादृष्टीने पालिकेच्या ग आणि फ प्रभागाने दररोज सकाळ, संध्याकाळ कारवाई सुरू केली आहे. या सततच्या कारवाईमुळे रेल्वे स्थानक भागातील रस्ते मोकळे राहत असल्याने पादचारी समाधान व्यक्त करत आहेत.
फेरीवाल्यांवर रस्ते, पदपथांवरून उठविण्याची कारवाई करण्यापेक्षा आता फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्याची आणि ते परत सोडून न देण्याचा निर्णय फेरीवाला हटाव पथक कारवाई पथकाने घेतला आहे. ग प्रभागात साहाय्यक आयुक्त संजय साबळे, फेरीवाला हटाव पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, परिमंडळ उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या आदेशावरून ग प्रभाग हद्दीतील रामनगर रेल्वे स्थानक भाग, डाॅ. राॅथ रस्ता, उर्सेकरवाडी, कामत मेडिकल पदपथ, दत्तनगर, संगीतावाडी, शिवमंदिर रस्ता भागात एकही फेरीवाला बसणार नाही यासाठी कारवाई सुरू केली आहे.
उर्सेकरवाडी भागात कारवाई करत असताना काही फेरीवाले आक्रमक झाले होते. त्यांना भाजप पदाधिकारी बाळा पवार यांनी पुढाकार घेऊन पालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईत अडथळा न आणण्याची तंबी दिली. बहुतांशी फेरीवाले मुंब्रा, भिवंडी, मस्जीद, भायखळा परिसरातून डोंबिवलीत येऊन व्यवसाय करत आहेत.
सकाळ, संध्याकाळ वर्दळीच्या वेळेत नागरिकांना चालण्यासाठी रस्ते मोकळे पाहिजेत असे आयुक्तांचे आदेश आहेत. रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला रस्ते, पदपथ अडवून बसणार नाही यादृष्टीने आम्ही दररोज कारवाई करत आहोत. एखादा फेरीवाला आक्रमक झाला तर त्याच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करतो. सकाळी आठ ते दुपारी एक, संध्याकाळी चार ते रात्री १० वाजेपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते, असे ग प्रभागाचे पथक प्रमुख साळुंखे यांनी सांगितले.