लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी शिळफाटा परिसरात केलेल्या नाकाबंदीत शस्त्रसाठा जप्त केला असून त्यामध्ये कोयता, तलवार, सुरा अशा शस्त्रांचा समावेश आहे.
भीती दाखवून पैसे लुटण्यासाठी हे दोघे शस्त्र स्वत:जवळ बाळगत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी शिळफाटा परिसरात केलेल्या नाकाबंदीत शस्त्रसाठा जप्त केला असून त्यामध्ये कोयता, तलवार, सुरा अशा शस्त्रांचा समावेश आहे. याप्रकरणी दोनजणांना पोलिसांनी अटक केली असून चोरीस गेलेल्या तीन रिक्षाही पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत. शस्त्राची भिती दाखवून पैसे लुटणे असे प्रकार हे दोघे करीत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
गौरव उर्फ बाल्या शिवराम वाघे (१९) आणि अरबाज शौकत अली पठाण (२० ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे भांडर्ली गावातील माणिकपाडा परिसरात राहतात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी शिळफाटा परिसरात ३० मार्च रोजी पहाटे नाकाबंदी केली होती. यावेळी कर्तव्यावर असलेले पोलिस उपनिरिक्षक संकेत शिंदे यांनी पनवेल येथून मुंब्रा दिशेने भरधाव जाणाऱ्या रिक्षाला थांबविले आणि त्यामध्ये बसलेल्या दोघांची चौकशी केली. त्याचवेळी एकजण रिक्षातून उतरून पळून जाऊ लागला.
पथकाने पाठलाग करून त्याला पकडले. त्यांच्या अंगझडती आणि घरझडतीमध्ये सात वेगवेगळ्या प्रकारे शस्त्र मिळाले असून त्यामध्ये तलवार, कोयता, सुरा अशा शस्त्रांचा समावेश आहे. तसेच ज्या रिक्षामधून शस्त्र घेऊन जात होते, ती रिक्षाही चोरीची असल्याचे चौकशीत समोर आले. यापूर्वी त्यांनी दोन रिक्षा चोरल्याचे तपासात उघडकीस आले. या तिन्ही रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. भीती दाखवून पैसे लुटण्यासाठी हे दोघे शस्त्र स्वत:जवळ बाळगत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी शिळ डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली.