क्षयरोग भारतामध्ये झपाट्याने पसरत आहे. लोकांना या आजाराची जाणीव व्हावी यासाठी दरवर्षी २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. क्षयरोग आजार झाला आहे किंवा नाही हे लवकर लक्षात येत नाही. आजार वाढल्यानंतर जेव्हा लक्षणे दिसू लागतात तेव्हा क्षयरोगाचे निदान होते.
याबाबतची नवीमुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्सचे फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. शाहिद पटेल यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. हे प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करते परंतु मूत्रपिंड, हाडे आणि मेंदू यासारख्या इतर अवयवांवर देखील याचा तितकाच परिणाम होऊ शकतो. जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा बोलते तेव्हा त्या थेंबा वाटे क्षयरोग हवेत पसरतो.
क्षयरोगाची लक्षणे कोणती?
दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा बेडकयुक्त खोकला, छातीत दुखणे, कफयुक्त खोकला किंवा रक्त येणे, थकवा, ताप, रात्रीच्या वेळी घाम येणे, नकळत वजन कमी होणे, भूक न लागणे. ही लक्षणे वेळीच ओळखणे आणि त्वरीत वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे, विशेषत: जर तुम्ही क्षयरोगाचे निदान झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात असाल किंवा तुम्ही धोकादायक क्षेत्रात राहत असाल.
क्षयरोगाचा प्रसार रोखणे ही क्षयरोगाच्या विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी सर्वात महत्वाची पायरी म्हणजे प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे.
1.लसीकरण: बीसीजी – Bacille Calmette-Guérin (BCG) लस क्षयरोगापासून संरक्षण देऊ शकते, विशेषतः लहान मुलांमध्ये, प्रौढांमध्ये फुप्फुसाचा क्षयरोग रोखण्यासाठी त्याची परिणामकारकता मर्यादित आहे.
2.संसर्गावर नियंत्रण: खोकताना किंवा शिंकताना आपले तोंड आणि नाक झाका. हवेच्या माध्यमातून संसर्ग पसरणार नाही याची खात्री करा.
3.स्क्रीनिंग आणि वेळीच निदान : तुम्हाला जास्त धोका असल्यास, जसे की एचआयव्ही/एड्स असलेल्या व्यक्ती, क्षयरोगींशी संपर्क किंवा गर्दीच्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींनी क्षयरोग तपासणी करा. वेळीच तपासणी त्वरित उपचार प्रदान करते आणि संक्रमणाचा धोका कमी करते.
4.उपचाराचा कोर्स पूर्ण करणे: क्षयरोगाचा उपचार हा ६ महिन्यांच्या कालावधीसाठी असतो. जरी एखाद्याला काही महिन्यांत बरे वाटू लागले, तरीही उपचारांचा कोर्स पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
क्षयरोग हा जागतिक आरोग्यासाठी एक महत्त्वाचा धोका आहे. क्षयरोगाची चिन्हे आणि लक्षणे समजून घेऊन, प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करून आणि वेळीच वैद्यकीय सेवा मिळाल्या तर या आजारापासून आपण स्वतःचे आणि इतरांचे रक्षण करु शकतो.
टिप- ही माहिती सामान्य आहे. अधिक माहितीसाठी डाँक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.