नेरळ: सुमित क्षीरसागर- एक्सर्बिया वांगणीच्या गृहप्रकल्पात घरांसाठी पॆसे भरून घरे न मिळाल्याने ग्राहक हवालदिल झाले होते. त्यामुळे रविवारी मनसेच्या माध्य मातून ग्राहकांनी जमत नेरळ पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यासाठी एल्गार पुकारला होता. तर ग्राहकांची फसवणूक केली म्हणून एक्सर्बिया प्रशासनावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिला होता. त्यामुळे एक्सर्बिया प्रशासन नरमले असून त्यांनी ग्राहकांच्या सर्व मागण्या मान्य करत ग्राहकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.
मुंबईपासून जवळ बजेट होम स्कीम म्हणून एक्सर्बियावांगणी हा गृहप्रकल्प सुरु झाला होता. त्यामुळे जाहिरातीला भुलून अनेकांनी कर्ज घेऊन येथे आपल्या हक्काचे छप्पर बुक केले होते. मात्र गेले ६ ते ७ वर्ष पैसे भरून हक्काच्या घरांपासून एक्सर्बियाचे ग्राहक वंचित राहिले होते. तर बँकेचे अधिकारी कर्ज वसुलीसाठी तगादा लावून होते. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था एक्सर्बिया वांगणी येथे घरे घेतलेल्या ग्राहकांची झाली होती. त्यामुळे या ग्राहकांनी अखेरचा मार्ग म्हणून मनसेचे दार ठोठावले. ग्राहकांना प्रकल्पाच्या दारातून परतीचा रस्ता दाखवणाऱ्या कंपनीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, ऍड. आदर्श तायडे व जयेश केवणे यांच्यापुढे अखेर नांग्या टाकल्या आहेत. दिनांक १७ मार्च रोजी एक्सर्बिया वांगणी प्रकल्पात घरे खरेदी केलेल्या ग्राहकांनी नेरळ पोलीस ठाणे येथे मनसेच्या माध्यमातून एकत्र येत एल्गार पुकारला होता. त्यामुळे लवकरच चर्चा करू असे आश्वसन एक्सर्बियाच्या अधिकाऱ्यांनी पाटील यांना दिले होते. तेव्हा दिनांक २० मार्च रोजी उमरोली येथील जितेंद्र पाटील यांच्या पक्ष कार्यालयात एक्सर्बियाचे अधिकारी यांच्या सोबत बैठक घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, ऍड. आदर्श तायडे व जयेश केवणे, एक्सर्बियाचे अधिकरी माणिक खरात, गणेश घाडीगावकर व असंख्य ग्राहक उपस्थित होते. या बैठकीत एक्सर्बिया प्रशासन हे ग्राहकांना नीट वागणूक देत नसल्याने जितेंद्र पाटील यांनी एक्सर्बिया अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. तर ग्राहकांनी आपल्या तक्रारी एक्सर्बिया प्रशासनापुढे ठेवत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी ज्या ग्राहकांनी पूर्ण पैसे भरले आहेत तरी त्यांच्या इमारतीचे काम पूर्ण नाही त्यांना तात्पुरते वरई येथील प्रकल्पात घरे देऊ, ज्यांना घरे नको त्यांना बुकिंग रद्द करण्याची प्रक्रिया करून ६ महिन्यात त्यांचे पैसे पार्ट केले जातील तसेच कंपनीमुळे ज्यांचे बँकेचे हफ्ते थकले आहेत. त्यांचे तात्पुरते हफ्ते देखील कंपनी भरेल तर काही खाजगी फायनान्स कंपन्या या प्रधानमंत्री आवास योजनेतील सबसिडी परत पाठवून त्याचा बोजा हा ग्राहकांवर टाकत आहेत. त्यावर ग्राहकांनी एकत्र आल्यास एक्सर्बिया कंपनीकडून संबंधित कर्ज देणाऱ्या खाजगी बँकांवर कायदेशीर प्रक्रिया करू असे आश्वसन एक्सर्बियाचे व्यवस्थापक माणिक खरात यांनी दिले.
यासह सर्व मागण्या मान्य करत एक्सर्बियाने ग्राहकांना दिलासा दिला आहे तर जितेंद्र पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने त्यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत.