Article 370: गोमंतकीय सिनेमा दिग्दर्शक आदित्य जांभळे यांच्या ‘आर्टिकल 370’ या पहिल्याच हिंदी सिनेमाने सिनेमागृहात 100 कोटींचा टप्पा गाठला.
Article 370: ‘आर्टिकल 370’ चित्रपटाने गाठला 100 कोटींचा टप्पा …
गोमंतकीय सिनेमा दिग्दर्शक आदित्य जांभळे यांच्या ‘आर्टिकल 370’ या पहिल्याच हिंदी सिनेमाने सिनेमागृहात 100 कोटींचा टप्पा गाठला. बॉलीवूडची कुठलीच पार्श्वभूमी नसलेल्या एका दिग्दर्शकासाठी ही सोपी गोष्ट नव्हती.
‘आर्टिकल-370’च्या अचंबित करणाऱ्या यशामुळे अवघे बॉलिवूड या नव्या दमाच्या चित्रपट दिग्दर्शकांकडे एका वेगळ्या नजरेने पहात असेल. स्वतः आदित्य आपल्या या यशाकडे कशा नजरेने पाहतो?
या यशामुळे अर्थातच मला आनंद झालेला आहे. या प्रकल्पाची जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हादेखील आमचे ध्येय हेच होते की हा सिनेमा सुपरहिट ब्लॉकबस्टर बनला पाहिजे. त्यामुळे मी असे म्हणणार नाही की या सिनेमाच्या यशाने मी अचंबित झालो आहे. जर असे यश मिळाले नसते तर मात्र आम्ही, विशेषतः मी वैयक्तिकरित्या दुःखी बनलो असतो.
इंडस्ट्रीमधील बर्याच लोकांनी मला सांगितले होते की हा सिनेमा चालणे अशक्य आहे. या सिनेमात ‘उरी’ सिनेमात असलेला ‘ॲटेक’ (action) नाही शिवाय त्यात खुप तांत्रिकता आहे, कायदेविषयक चर्चा आहे आणि अशा गोष्टी लोकांना आवडत नाहीत असे त्यांचे म्हणणे होते.
फायदा तर सोडाच पण सिनेमाचा खर्च जरी भरून आला तरी ते फार झाले असे असे या लोकांनी मला सांगितले होते पण मला तेव्हाही वाटत होते की हा सिनेमा खुप पुढे जाऊ शकतो आणि जाणार आहे. जेव्हा ‘आर्टिकल- ३७०’ सिनेमागृहामध्ये लागला आणि पहिल्याच दिवशी त्यांची पूर्ण तिकिटे विकली गेल्याचे मला कळले तेव्हाच हा सिनेमा उंची गाठेल याची कल्पना मला आली होती.
‘आर्टिकल-३७०’ मध्ये अशी कुठली गोष्ट होती ज्यामुळे आदित्य जांभळेला आत्मविश्वास वाटत होता की हा सिनेमा १०० कोटींचा टप्पा पार करेल?
मी आतापर्यंत जेवढे काम केले आहे, मग ते थिएटर असो वा लघुपट असो, त्यातील ‘ड्रामा’ हा घटक प्रभावी होता. ‘आर्ट’ च्या नावाखाली मी लोकांना कंटाळा येईल असे काम मी केलेले नाही. केवळ महोत्सवासाठी मी सिनेमा केलेले नाहीत. त्याशिवाय माझे ‘क्लायमॅक्स’ प्रभावी असतात हा विश्वासही माझ्यात होता.
सिनेमा पाहून लोक जेव्हा बाहेर येतात तेव्हा लोकांना वाटायला हवे की आपले पैसे वसूल झालेले आहेत, आपले मनोरंजन झाले आहे, संदेशही मिळाला आहे आणि न विसरता येण्यासारखे आपण काहीतरी पाहिले आहे. माझी जी शैली आहे त्यातून मी माझ्या प्रेक्षकांना कंटाळा आणणार नाही व ते खुर्चीला खिळून राहतील हा आत्मविश्वास माझ्यात होता. माझ्या सिनेमामध्ये मोठा हिरो नव्हता.
दोन नायिकांवर भिस्त असलेला माझा सिनेमा होता (यामी गौतम आणि प्रियमणी) पण ज्याप्रकारे या सिनेमात ‘राजकारण’ या घटकाची मांडणी केली गेली आहे ती वेगळी होती. ‘राजकारण’ आणि ‘राजकारणी’ याबद्दल हा सिनेमा बघण्यार्या युवावर्गाचे अनुकुल मत तयार व्हावे आणि राजकारण ही वाईट गोष्ट नाही हा विचार त्यांच्या मनात यावा हेच माझे धोरण होते.
चांगला हेतू बाळगून राजकारणी बनून आपण हा देश बदलू शकतो असे त्यांना वाटायला हवे. ‘उरी’ हा सिनेमा पाहून अनेक युवकांना सैन्यदलात सामील व्हावे असे वाटले. ‘राजकारण’ ही प्रेरक बाब व्हावी असे मला वाटते. ‘ॲक्शन’ पेक्षा या सिनेमातील राजकारण हा भाग प्रेक्षकांना आकर्षित करेल याची मला खात्री होती.
बंद दाराआड जे राजकारण घडते त्यातून देखील प्रभावी नाट्य आकाराला येऊ शकते. काही पाश्चिमात्य सिनेमातून राजकारणाची हाताळणी फार चांगल्या प्रकारे झालेली आढळते पण बॉलिवूडमध्ये ‘पॉलिटिकल थ्रिलर’ हा प्रकार अस्तित्वातच नव्हता पण हा प्रकार प्रेक्षक उचलून धरतील हा विश्वास मला होता.
‘आर्टिकल-३७०’ मध्ये एकही आयटम सॉग नाही, नायक-नायिका गात असलेले एकही गाणे नाही, त्यात कुणी मोठा हिरो नाही पण त्यातील जो वास्तववाद आहे- त्यात राजकारण कसे चालते, मेडिआ कशाप्रकारे काम करते हा सामान्य लोकांना ठाऊक नसणारा भाग आहे. हे लोकाना आवडेल हा मला विश्वास होता.
प्रेक्षकांना काय आवडेल याचा विचार आदित्य जांभळे कसा करतो?..
भारतीय प्रेक्षक हा सर्वात ‘स्मार्ट’ प्रेक्षक आहे असे मला वाटते. त्यांना सिनेमात सारे काही हवे असते. मनोरंजन, संदेश याचबरोबर दूरदृष्टीचे असेही काहीतरी त्यांना सिनेमातून अपेक्षित असते. भारतीय प्रेक्षक जर मुर्ख असते तर सारेच सिनेमा चालले असते. पण तसे होत नाही याचाच अर्थ ते आपली निवड व्यवस्थित करतात असा होतो. पण त्याचबरोबर त्यांना काय हवे त्याचाच विचार निर्माता-दिग्दर्शक करत राहिले तर त्यात फसून जाण्याची शक्यताच अधिक आहे.
तसा विचार करत आम्ही सिनेमा बनवत राहिलो तर आम्ही कुठेच पोहचू शकणार नाही. सैराट चालला म्हणून तसाच दुसरा सिनेमा बनवण्याचा प्रयत्न इंडस्ट्रीतील अनेकजण करतात पण असे प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाहीत. याचा अर्थ हा आहे की भारतीय प्रेक्षक ‘फॉर्म्युला’च्या आहारी गेलेला नाही. त्यांना बुध्दिमान आणि भावनिक सिनेमा हवा आहे. निर्माता-दिग्दर्शकांचा हेतू प्रेक्षकांना नक्कीच कळत असतो. प्रामाणिक सिनेमाला भारतीय प्रेक्षक नेहमीच दाद देत आला आहे.