सोलापूर : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर उदय सामंतांनी शासकीय विश्रामगृह येथे सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. रत्नागिरी जिल्ह्यात शशिकांत वारीशे पत्रकाराच्या हत्ये मागे कुणाचा हात आहे, संशयीत आरोपी सोबत तुमचे फोटो आहेत, असा प्रश्न विचारला असता, संशयीत आरोपी आंबेकर हा अतिशय खूप हुशार व्यक्ती आहे. अनेक राजकारण्यांसोबत, नेत्यांसोबत त्याने फोटो काढून ठेवले आहेत. माझा फोटो त्यासोबत असला तर, मी संशयीत आरोपी झालो का? असा प्रश्न उदय सामंत यांनी विचारला. पत्रकार खुनातील अटक असलेल्या संशयीत आरोपीने खासदार विनायक राऊत यांसोबत देखील फोटो आहे. हे फोटो पाहून आम्ही खा. विनायक राऊत यांवर आरोप केले नाही. असले घाणेरडे राजकारण मला करावयाचे नाही.असे उदय सामंत यांनी म्हटले आरत्नागिरी जिल्ह्यात ज्यावेळी शशिकांत वारीशे याचा मृत्यू झाला त्यावेळी मी स्वतः पुढाकार घेतला. पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना भेटून गुन्हा दाखल करण्यासाठी सुचना दिल्या. भा.द.वि. 304 प्रमाणे गुन्हा होता. मी स्वतः माहिती घेत खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आंबेकर, विनायक राऊत यांचा एकत्रित फोटो दाखवत विरोधकांना इशारा दिला आहे. माझ्याकडे देखील आंबेकर सोबत असलेले अनेक नेत्यांचे फोटो आहेत. मला याच राजकारण करायचे नाही. कारण एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. असले घाणेरडे राजकारण मी करत नाही. पण ज्या वेळी आपण दुसऱ्यावर एक बोट करतो तर, आपल्याकडे तीन बोट असतात, याच भान असले पाहिजे. आंबेकर या व्यक्तिवर कडक कारवाई झाली पाहिजे ही माझी भूमिका काल देखील होती. आज देखील हीच भूमिका कायम असणार आहे असे उदय सामंत म्हणाले. विनायक राऊत, राजन साळवी यांनी पत्रकाराच्या घरी जाऊन जी मागणी केली त्याच मी समर्थन करत आहे असेही उदय सामंत म्हणाले.