रशियात रविवारी पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा सत्ता संपादन केली आहे. राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांना तब्बल 87.17 टक्के मतं पडल्याचा दावा वृत्तसंस्थेनं केला आहे.
मॉस्को : रशियात रविवारी राष्ट्राध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी तब्बल 87.17 टक्के मतं घेत प्रचंड बहुमतानं विजय संपादन केला आहे. युक्रेनच्या हल्ल्यानंतर त्यांनी हाताळलेल्या परिस्थितीनुसार त्यांना विजयाचं प्रबळ दावेदार मानलं जात होतं. अद्याप राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या विजयाची औपचारिक घोषणा झाली नाही. मात्र ब्लादिमीर पुतिन हेच पुन्हा राष्ट्राध्यक्ष होणार असल्याचं निश्चित झालं आहे.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मिळाली 87.17 टक्के मतं…
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जोरदार विजय मिळवला आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तीन दिवस चाललेल्या या निवडणूक प्रक्रियेत तब्बल 87.17 टक्के मतं मिळविली, असं वृत्तसंस्थेनं रशियन फेडरेशन केंद्रीय निवडणूक आयोगाच्या डेटाचा हवाला देऊन स्पष्ट केलं आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ रशियन फेडरेशनचे उमेदवार निकोलाई खारिटोनोव्ह यांना 4.1 टक्के मतं मिळाली आहेत. या निवडणुकीत ते दुसऱ्या स्थानावर आहेत. न्यू पीपल पार्टीचे उमेदवार व्लादिस्लाव दाव्हान्कोव्ह 4.8 टक्के मतांसह या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर आहेत.
सर्वाधिक काळ राष्ट्राध्यक्ष राहण्याचा केला विक्रम…
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या निवडणुकीत पुन्हा यश संपादन करत आपलं राष्ट्राध्यक्ष पद सुरक्षित केलं आहे. बोरिस येल्तसिन यांची प्रकृती खराब झाल्यानंतर त्यांनी 1999 मध्ये व्लादिमीर पुतिन यांच्याकडं सत्तेची सूत्रं सोपवली होती. तेव्हापासून व्लादिमीर पुतिन हे पंतप्रधान ते राष्ट्राध्यक्ष अशा पदावर सतत सत्तेवर आहेत. 1999 पासून व्लादिमीर पुतिन हे एकही निवडणूक हारले नाहीत. त्यामुळे त्यांचा रशियाच्या राजकारणात विशेष दबदबा आहे. व्लादिमीर पुतिन यांनी सर्वाधिक काळ रशियाच्या सत्तेत राहण्याचा जोसेफ स्टालिन यांचा विक्रम मोडला आहे. आता रशियाच्या सत्तेत सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम व्लादिमीर पुतिन यांच्या नावावर नमूद झाला आहे.