नवी दिल्ली- निवडणुकीतील देणग्यांविषयी रोज धक्कादायक खुलासे होताहेत. कोलकात्यातील कंपनी मदनलाल लि. ने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दोनदा १८२.५ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. पण या काळात त्यांचा नफा फक्त १.८१ कोटी रु. होता. २०२०-२१ मध्ये तो २.७२ कोटी तर २०२२-२३ मध्ये फक्त ४४ लाख होता.
अशाच इतर अनेक कंपन्या, ज्यांनी त्यांच्या निव्वळ नफ्यापेक्षा कितीतरी पट अधिक निवडणूक देणग्या दिल्या. इतकेच नाही तर सर्वाधिक देणग्या देणाऱ्या ३० कंपन्यांपैकी १४ कंपन्यांवर केंद्र किंवा राज्याच्या तपास यंत्रणांनी कारवाई केली. ३० अशा कंपन्या आहेत ज्यांनी छापेमारीनंतर मोठ्या निवडणूक देणग्या दिल्या. डीएलएफ कमर्शियलने ३० कोटींची देणगी दिली. जमीन वाटप अनियमिततेमुळे सीबीआयने जानेवारी २०१९ मध्ये कंपनीवर छापा टाकला होता.
काही कंपन्यांचे रेकॉर्ड देखील अपडेट नाही…
▪️अभिजित मित्रा: ४.२५ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. त्यांच्या नावे कोलकाताची सिरॉक इन्फ्रा प्रोजेक्ट नावाची कंपनी नोंदणीकृत आहे. त्याचे एकूण शेअर केवळ ६.४० लाखांचे आहेत. बोर्डाची बैठक २०२२ मध्ये झाली होती. दोन वर्षांपासून काहीही अपडेट नाही.
▪️एस. अर्बन डेव्हलपर्स: हैदराबादच्या कंपनीने २०२२ मध्ये मेहुल चोकसी यांची कंपनी एपी जेम्स अँड ज्वेलरीची खरेदी केली. अनिल शेट्टी यांच्या कंपनीने १७ नोव्हेंबर २०२३ रोजी १० कोटी देणगी दिली.
▪️चेन्नई ग्रीनवूड :गौतम होराच्या कंपनीने १०५ कोटींची देणगी दिली. शेअर भांडवल ४३ कोटी.
▪️क्रिसेंट पाॅवर : ३४ कोटींची देणगी. वार्षिक नफा ३४६ कोटी आहे. म्हणजे १० टक्के नफा दान केला.
▪️जीनस पॉवर : एकूण ३८.५ कोटी देणगी. १९९२ मध्ये स्थापन कंपनीचे उत्पन्न डिसेंबरच्या तिमाहीत घटून ९.९२ कोटी झाले. एकूण उत्पन्न २०.९१ कोटी आहे.
▪️अभिनंदन स्टॉक ब्रोकिंग : एकूण १४.७० कोटी रुपयांची देणगी दिली. कोलकाताच्या या कंपनीचे शेअर भांडवल १.१५ कोटी आहे. निखिल जैन यांच्या कंपनीविषयी जास्त अपडेट नाही.
▪️अपर्णा फार्म : हैदराबादच्या कंपनीने ३० कोटी रुपये देणगी दिली. कंपनीबद्दल अल्प माहिती आहे. २०२३ मध्ये कंपनीचा नफा याहून कमी होता.
▪️एवीज ट्रेडिंग : ११२.५ कोटी रुपयांची देणगी दिली. रमेश कुमार सरावगी यांच्या कंपनीने नफ्याची माहितीही दिली नाही.
▪️इनफिना फायनान्स : ६० कोटींची देणगी दिली. केअर रेटिंग्जच्या अहवालानुसार कंपनीचे उत्पन्न २०२२ मध्ये ५३६ कोटी होते. २०२३ मध्ये त्यात घट होऊन ते निम्मे (२२८ कोटी) राहिले आहे.
सरन्यायाधीशांनी उलगडला.. निवडणूक रोख्यांचा खरा खेळ…
▪️सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की समजा ‘ए’ ने बाँड विकत घेतला. त्याचे बँकेत केवायसी आहे. तो ‘बी’ ला देतो. ‘बी’ कोणत्याही ‘सी’ ला देऊ शकतो आणि ‘सी’ तो राजकीय पक्षाला देऊ शकतो. बाँड किती वेळा सुपूर्द करता येईल याची मर्यादा नाही. त्यामुळे ‘सी”कडून पक्षाला मिळालेली देणगी कुणी दिली हे तुम्हाला कधीच कळत नाही.
▪️निवडणूक रोख्यांची अपूर्ण माहिती दिल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली. कोर्टाने एसबीआयला म्हटले की, बाँडबाबत संपूर्ण माहिती देणे तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही युनिक अल्फा-न्यूमेरिक कोड का उघड केले नाही? या कोडद्वारेच कोणत्या कंपनीने/व्यक्तीने कोणत्या राजकीय पक्षाला किती देणगी दिली हे कळेल. कोर्टाने बँकेला १८ मार्चपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
▪️हेल्थकेअर कंपन्यांनी ५३४ कोटींची दिले देणगी… आरोग्य देखभालीची उपकरणे, आैषधीच्या १४ कंपन्यांनी ५३४ कोटींची देणगी दिली. रक्कम २०-१०० कोटी आहे. त्यात डॉ. रेड्डीज लॅब, टोरँट, नाटको फार्मा, डिव्हिस लॅब, अरबिंदो फार्मा, सिपला, सनफार्मा लॅब, हेट्रो ड्रग्ज, झायडस हेल्थकेअर, मॅनकाइंड फार्मा.
▪️पुढची यादी उद्या, त्यात ~ ४,००२ कोटींचा हिशेब… स्टेट बँकेने १ मार्च २०१८ पासून १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत १६,५१८ कोटी रुपयांचे २८,०३० रोखे विकले. सध्या १८,८७१ रोख्यांची माहिती जाहीर झाली आहे. उर्वरित ४००२ कोटी रुपयांच्या ९,१५९ रोख्यांची माहिती १७ मार्चला सायंकाळी ५ वाजेपर्यंत जाहीर करण्याचे आदेश आहेत.
▪️मद्य कंपन्यांनी दिले ३४ कोटी : मद्य कंपन्यांनी पाच वर्षांत ३४.५४ कोटी रुपयांची देणगी दिली. कोलकाताच्या केसल लिकरने ७.५ कोटी, भोपाळचे सोम ग्रुपने ३ कोटी, छत्तीसगड डिस्टिलरीजने ३ कोटी, मप्रशी संबंधित मा.एव्हरेस्ट बेव्हरिजने १.९९ कोटी, एसो अल्कोहोलने २ कोटी दिले.
▪️निवडणूक रोख्याच्या सर्वात वर गुप्त क्रमांक असतो. तो अल्ट्रा व्हॉयलेट प्रकाशातच बघता येतो. याद्वारे रोखे खरेदीदार आणि वटवणाऱ्याचे नाव कळते.