पुणे :- तुम्हा पत्रकारांना मी ब्रेकिंग बातमी देतो, तसं मी न्यायालयातील प्रकरणांवर कधी बोलत नाही. राज्यातील सत्तासंघर्ष निकाल कोणाच्या बाजूने येणार हे सांगतो. उद्धव ठाकरे ज्या चिन्हासाठी भांडत आहेत, ते त्यांच्या हातून जाऊन शिंदे यांच्या हाती येणार आहे, असे भाकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच राणेंनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता नारायण राणे आज शनिवारी पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत ते म्हणाले, राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यापासून महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा वाद चर्चेत आहे. हा विषय आता सर्वोच्च न्यायालयात असून १४ फेब्रुवारी रोजी या सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटासह संपूर्ण राज्याचं लक्ष सुनावणीकडे लागलं आहे. सत्तासंघर्षाचा निर्णय न्यायालयात प्रलंबित असताना भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सूचक विधान करून नव्या चर्चेला तोंड फोडून दिले.
” ही ब्रेकिंग न्यूज टाका ” असं सांगत राणेंनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कुणाच्या बाजूने येणार याची भविष्यवाणी करून नव्या वादाला जागा करून दिली. राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीबाबत राणे म्हणाले, “मी ज्योतिष सांगू का? कारण न्यायालयातील प्रकरणांवर मी कधी बोलत नाही. पण उद्धव ठाकरे ज्या चिन्हासाठी भांडत आहेत. ते चिन्ह त्यांच्या हातातून जाणार आहे. ते चिन्ह ४० आमदारांचा पाठिंबा असलेले विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला नारायण राणेंनी उत्तर देत पक्षाची बाजू स्पष्ट केली. “ मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही विकास केलेला आहे. मुलं जन्माला घातलं की नाव देण्याचा अधिकार कोणाला ?… वडिलांनाच ना ?. आमच्या विविध योजना महाराष्ट्रात सुरू असून अजूनही होणार आहेत. शुक्रवारी दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या. पंतप्रधानांना बोलावलं, पैसे ते देतात. त्यात चुकीचं काय ? काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सोबत सत्तेत बसल्यावर अडीच वर्षांत शिवेसेनेने काय केलं ? हे त्यांनी सांगावं. मातोश्री सोडून मंत्रालयात अडीच वर्षांत अडीच तास शिवाय ते बसले नाहीत. यांना तुम्ही मुख्यमंत्री समजण्याची चूक केली की नाही ? असा सवालही राणेंनी केला.
पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवर भाष्य करताना राणे म्हणाले, “ या दोन्ही पोटनिवडणुकीच्या जागा आमच्याच असून आम्ही दोन्ही जागा मोठ्या मताधिक्क्याने जिंकणारच आहोत. विरोधक धुळीसारखे उडणार असून मतदार हेच दाखवून देतील. कारण भाजपा ग्रामपंचायत ते लोकसभा बरोबर कोणतीही निवडणूक गांभीर्याने घेऊन त्यांना सामोरे जातो असेही त्यांनी सांगितले.
पत्रकार शशिकांत वारिसे अपघात प्रकरणी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या आरोपाबाबत बोलताना राणे म्हणाले की, राऊत एवढे मोठे नाहीत, त्यामुळे त्यांच्या आरोपावर बोलणार नाही.
जाहिरात :