MIW vs UPW : यूपी वॉरियर्सने महिला प्रीमियर लीगमधील आपला पहिलाच विजय मिळवला. त्यांनी गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सहज पराभव केला…
WPL 2024 MIW vs UPW : महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये आज गतविजेता मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात लढत झाली. या लढतीत यूपी वॉरियर्सने गतविजेत्यांना पराभवाची धुळ चारली. यूपीने मुंबई इंडियन्सचे 162 धावांचे आव्हान 17 षटकात 3 बॅटर्सच्या मोबदल्यात पार केले. यूपी कडून किरण नवगिरेने 31 चेंडूत 57 धावा चोपल्या. याचबरोबर ग्रेस हॅरिसने 17 चेंडूत नाबाद 38 धावा ठोकत यूपीचा विजय सुकर केला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या यूपी वॉरियर्सने हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा डाव 161 धावात रोखला होता. मुंबईकडून सलामीवीर हेली मॅथ्यूजने धडाकेबाज फलंदाजी करत 47 चेंडूत 55 धावा केल्या होत्या. यस्तिका भाटियाने 27 तर काळजीवाहू कर्णधार नॅट सिव्हर ब्रंटने 19 धावांचे योगदान दिले होते. मुंबईकडून स्लॉग ओव्हरमध्ये वाँगने 6 चेंडूत 15 धावा चोपल्या. यामुळे संघाने 161 धावांचा टप्पा गाठला.
मुंबईचे 162 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या यूपीने धडाकेबाज सुरूवात केली. सलामीवीर एलिसा हेली आणि आज संधी मिळालेल्या किरण नवगिरेने धडाकेबाज फलंदाजी केली. या दोघांनी 9.1 षटकात 94 धावांची सलामी दिली. यात किरणच्या 31 चेंडूत केलेल्या 57 धावांचा मोठा वाटा होता. तिने आपल्या खेळीत 4 षटकार अन् 6 चौकार मारले. तर हेलीने 31 धावांचे योगदान दिले.
त्यानंतर ग्रेस हॅरीने 17 चेंडूत 38 धावा चोपून काढल्या. तिला दिप्ती शर्माने 20 चेंडूत 27 धावा करत चांगली साथ दिली या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी रचत मुंबईचे 162 धावांचे आव्हान 17 व्या षटकातच पार केलं. यूपीचा हा यंदाच्या महिला प्रीमियर लीगमधील पहिलाच विजय आहे.