नांदेड- वयोमानानुसार आपल्या शरीराची झीज होत जाते, असं म्हटलं जातं. अर्धापूर तालुक्यातील पार्डी मक्ता गावातील ७० वर्षांच्या पंचफुलाबाई डोईफोडेंच्या बाबतीत मात्र हे काही अपवादात्मक ठरतं. त्यांचे डोळे, दात, कान अगदी तीक्ष्ण असून आणि तब्येत ठणठणीत आहे. त्यांनी आजही २० गुंठ्यात ६ पिकं घेण्याची किमया करून दाखवली आहे. एवढेच नाहीतर लागवड ते विक्री करून महिन्याला ४०-४५ हजारांचे उत्पन्न मिळवतात. या आजींची जिल्ह्यात मोठी चर्चा आहे.
पंचफुलाबाई डोईफोडे यांनी वीस गुंठ्यात पपई पिकाची लागवड केली आहे. या २० गुंठ्यात त्यांनी अंतर्गत पीक म्हणून काकडी, दोडके, मिरची, टोमॅटो, वांगे आदीची लागवड केली आहे. या सर्व पिकातून त्यांना दररोज १२०० ते १५०० रुपये उत्पन्न मिळत आहे. ७० वर्षाच्या पंचफुलाबाई स्वतः पिकांची काळजी घेतात. स्वतः पिकांना पाणी देणे, निदंणे, फवारणी करणे हे सर्व कामे स्वतः करतात. या कामात त्यांचा मुलगा विठ्ठल डोईफोडे हे देखील मदत करत असतात. विठ्ठल डोईफोडे हे सुतार कामाचा व्यवसाय करत आपल्या आईला शेताच्या कामात लागणारे बी – बियाणे खते आणून देतात. रासायनिक पद्धतीने भाजीपाला हे पिके घेऊन स्वतः बाजारात विक्री करण्यासाठी नेतात तसेच पार्डी गावात घरोघरी विकतात.
पार्डी येथील गृहिणींना ताजा भाजीपाला मिळत असल्याने पंचफुलाबाई डोईफोडे यांच्याकडून भाजीपाला घेण्यासाठी गर्दी होते. दररोज शेतामधून भाजीपाला आणून विकल्याने त्यांना १२०० ते १५०० रुपये नगदी उत्पन्न मिळत आहे. पंचफुलाबाई ७० वर्षाच्या असून सुद्धा दिवसरात्र शेतामध्ये काम करीत आहेत. रात्रीला पिकांना पाणी देण्यासाठी सुद्धा जात असतात. त्या ७० वर्षाच्या असून शेतात राबून शेती करीत आहेत. या वयात त्यांची जिद्द आणि चिकाटी सर्व तरुण शेतकऱ्यांना ऊर्जा देणारी आहे. मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही, मेहनतीने कमावले तर त्यामध्ये समाधान मिळते. कमी जमिनीत जास्त उत्पन्न काढण्याची किमया आजी हे करून दाखवत आहेत. एका पिकांवर अवलंबून न राहता अंतर्गत पिके घेऊन भरघोस उत्पन्न काढता येते. तसेच स्वतः मेहनत केल्यावर उत्पन्न मिळतेच तसेच अन्य खर्च वाचतो. त्यामुळे शेतात इतर पिकासोबतच अंतरपीक घेऊन उत्पादन वाढवावे, असं आवाहन या आजीबाईने केलं आहे.