शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच निधन झालं. आज (23 फेब्रुवारी ) पहाटे 3 वाजून 02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते.
शिवसेनेचा ‘कोहिनूर’ हरपला, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन…
प्रतिनिधी, मुंबई | 23 फेब्रुवारी 2024 : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं. आज (23 फेब्रुवारी ) पहाटे 3 वाजून 02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ॲडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल.
माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष सरांवर दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार होतील. मे 2023 मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती.
ब्रेन हॅमरेजचा झाला होता त्रास…
मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. काल त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी वाहिली श्रद्धांजली…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्य्कत करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.