पुण्यात तब्बल 1100 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त..
पुणे – पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी 600 किलोहून अधिक मेफेड्रोन ड्रग जप्त केले. बाजारात या ड्रगची किंमत 1100 कोटींहून अधिकची असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, विश्रांतवाडी येथील भैरव नगर येथील एका गोदामातून 55 किलो, तर कुरकुंभ एमआयडीसीतील एका कारखान्यातून सुमारे 550 किलो एमडी ड्रग जप्त करण्यात आले. या कारवाईत आतापर्यंत 1100 कोटींचे ड्रग जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
या प्रकरणी वैभव उर्फ पिंट्या भरत माने, अजय अमरनाथ करोसिया (वय 35) आणि हैदर नूर शेख (वय 40, रा. विश्रांतवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. हैदरने भाड्याने घेतलेल्या विश्रांतवाडीतील गोदामात मीठ व रांगोळीचा साठा करण्यात आला होता. पांढऱ्या स्फटिकांसारखे दिसणारे मेफेड्रोन ड्रग लहान पिशव्यांत भरण्यात आले होते. या पिशव्या मिठाच्या मोठ्या गोण्यांमध्ये लपवण्यात आले होते. पोलिसांना या प्रकरणी पॉल व ब्रू नामक 2 ड्रग पेडलर्स म्हणजेच मुंबईतील ड्रग्ज विक्रेत्यांची माहितीही मिळाली आहे. सध्या त्यांचा शोध घेतला जात आहे. जप्त करण्यात आलेले एमडी ड्रग दलालांमार्फत देश-विदेशात वितरित केले जाणार होते.