वंदे भारत एक्सप्रेसला आसनगाव, कसारा येथे थांबा देण्याची मागणी

Spread the love

कल्याण- मुंबई ते शिर्डी (साईनगर) रेल्वे मार्गावरील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आसनगाव, कसारा रेल्वे स्थानकांमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा, अशी जोरदार मागणी या भागातील प्रवाशांकडून रेल्वे अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. शहापूर, कसारा परिसरातील नागरिकांची मागणी विचारात घेऊन ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे शहापूर उपतालुका प्रमुख भरत उबाळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे वंदे भारत एक्सप्रेसला आसनगाव, कसारा रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी केली आहे.

शहापूर, भिवंडी, वाडा, मुरबाड, वसई, मोखाडा भागातील अनेक भाविक नियमित शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जातात. या भाविकांना शिर्डी येथे जाण्यासाठी यापूर्वी एस. टी. महामंडळाची बस किंवा खासगी बस सेवेचा आधार घेऊन प्रवास करावा लागत होता. आता वंदे भारत एक्सप्रेसची सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांना आपल्या जवळच्या रेल्वे स्थानका जवळ वंदे भारत एक्सप्रेसला थांबा दिला तर साई भक्तांना आडमार्गी प्रवासाऐवजी एका बैठकीतून शिर्डी येथे पोहचणे शक्य होणार आहे, असे उप तालुकाप्रमुख उबाळे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले आहे.

शहापूर तालुक्यातील आसनगाव रेल्वे स्थानक परिसरात सुमारे २५० हून अधिक गावे आहेत. कसारा रेल्वे स्थानक भागात गाव, पाडे, वाड्या आहेत. आसनगाव, कसारा रेल्वे स्थानकात वंदे भारत एक्सप्रेसला थांबा दिला तर या भागातील प्रवाशांना शिर्डीला जाण्यासाठी सुखाचा प्रवास उपलब्ध होणार आहे, असे उबाळे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले. एक दिवसात शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेऊन परतणे वंदे भारत एक्सप्रेसमुळे शक्य होणार असल्याने साई भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ६.१५ वाजता सीएसएमटीहून सुटून दुपारी १२.१० वाजता शिर्डीला पोहचणार आहे. ही एक्सप्रेस त्याच दिवशी संध्याकाळी ५.२५ वाजता शिर्डीहून सुटून मुंबईत रात्री ११.१८ वाजता पोहचणार आहे. या एक्सप्रेसला १६ डबे आहेत. एक हजार १२८ प्रवासी क्षमता आहे, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. एक्सप्रेसला थांबा देणे हा रेल्वे प्रशासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. वरिष्ठ पातळीवर याविषयी निर्णय घेतले जातात, असे रेल्वे अधिकारी म्हणाला.

जाहिरात :

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page