शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. शहाजी बापू पाटील हे नाजरा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिरासाठी गेले होते. मात्र, तेथून परतत असताना त्यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीला एक दुचाकीस्वार वेगाने धडकला. त्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवसाच्या दिवशीच ही घटना घडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शहाजीबापू पाटील यांनी हजेरी लावली. शहाजीबापू हे शिबिराचा कार्यक्रम संपल्यानंतर सांगोला शहराकडे निघाले. त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलीस संरक्षक गाडीचा ताफा होता. दरम्यान आमदारांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलीस गाडीवर दुचाकी स्वार येऊन धडकला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली होती. अपघात झालेल्या दुचाकी स्वाराचं नाव अशोक वाघमारे असून तो सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे. तर त्याच्या पाठीमागे बसलेले नाना अमूने हे सांगोला तालुक्यातील रहिवासी आहेत. नाना अमूने यांच्यावर सांगोला तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.