रत्नागिरी दि.४ (जिमाका) : १५ ऑगस्टपर्यंत प्राणी संग्रहालयाचे काम पूर्ण होईल, अशा पध्दतीने संबंधित विभागांनी कामकाज करावे, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
प्राणी संग्रहालय उभारण्याबाबत पालकमंत्री श्री. सामंत यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयममध्ये आढावा बैठक घेतली. बैठकीला एमआयडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सिंधुरत्नचे विशेष निमंत्रित किरण सामंत, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपवन संरक्षक दीपक खाडे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. त्यामध्ये एमआयडीसीचे अधिकारी, प्रांत, पोलीस उपअधीक्षक, गटविकास अधिकारी, वन खाते, सार्वजनिक बांधकाम विभाग, दोन अशासकीय सदस्य यांचा समावेश करावा. वन विभागाने कात्रज, जयपूर, नागपूर येथील संग्रहालयांशी समन्वय साधावा. हे प्राणी संग्रहालय सर्वोत्तम करु. याठिकाणी फुड पार्क, सोव्हीनियर शॉप सुविधा देऊ. यासाठी सिंधुरत्नमधून निधी दिला जाईल. आवश्यक पडल्यास एमआयडीसी मधून निधी देऊ, असेही ते म्हणाले.